जिल्ह्यात पुढील १०० दिवस क्षयरोग मोहीम नागरिकांनी सहभागी व्हावे 

जिल्ह्यात पुढील १०० दिवस क्षयरोग मोहीम नागरिकांनी सहभागी व्हावे 

भंडारा,दि.04 : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हयात ०७ डिसेंबर २०२४ पासून १०० दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम ७ डिसेंबर २०२४ रोजी सुरू होणार असून दिनांक २४ मार्च जागतिक क्षयरोग दिन २०२५ रोजी संपणार आहे.

या दरम्यान जिल्ह्यातील १९१ प्रा.आ.केंद्र, उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी मार्फत ३,६१,५८९ जोखमीच्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. सदरील मोहीमेच्या प्रभावी अंमलबजावणी करीता मोहिमेत सर्व नागरिकांनी सक्रिय सहभागी होऊन क्षयरोग मिटवण्यासाठी व २०२५ पर्यंत भंडारा जिल्हा क्षयरोगमुक्त होईल या साठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांनी केले आहे.

या मोहीमेचा उद्देश हा जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटका पर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोगा विषयी जनजागृती करणे, समाजामधील क्षयरोग विषयी असलेले गैरसमज दूर करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे, जिल्हयातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत निक्षयमित्र यांचेकडुन पोषण आहार कीटचे वाटप करणे असा आहे.

१०० दिवसीय क्षयरोग मोहीम देशभरातील ३४७ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये आपल्या भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे. या मोहिमेमध्ये जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करणे, नि-क्षय शिबीर, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह येथे क्षयरोग तपासणी शिबिर व स्थलांतरीत,ऊस तोडणी कामगार,उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटक यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यातील संशयित व्यक्तीची थुंकी तपासणीबरोबर क्ष-किरण तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तर व तालुकास्तरावर नियोजन केले आहे.

या मोहिमेबाबत मंगळवारी केंद्रीय स्तरावरील व्ही.सी.मध्ये बोलताना जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते म्हणाले या मोहीम राबविणे करीता लोकप्रतिनिधी/सामाजीक संस्था/सामाजीक कार्यकर्ते व इतर विभाग यांचा सहभाग घेऊन,मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. तसेच नागरिकांनीही घरी तपासनीस आलेल्या आरोग्य कर्मचारी याना सर्वोतोपरी सहकार्य करून मोहीम यशस्वी करावी असे आवाहन केले. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अमरदीप नंदेश्वर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दीपचंद सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलिंद सोमकुंवर व वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होते.