‘मिशन पुना आकी’: दुर्गम भागात आधार-जन्म दाखला देण्यासाठी विशेष मोहिम 

मिशन पुना आकी‘: दुर्गम भागात आधार-जन्म दाखला देण्यासाठी विशेष मोहिम 

  • पंचायत समिती भामरागडचा उपक्रम

गडचिरोली दि. १२ :  गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या भामरागड तालुक्यात नागरिकांना आधार कार्ड व जन्म दाखला जागेवरच उपलब्ध करून त्यांच्या समस्या सोडवण्याकरिता तसेच महिलांच्या  आरोग्यावर जनजागृती व्हावी याकरिता पंचायत समिती भामरागड तर्फे आकांक्षीत तालुका कार्यक्रम अंतर्गत ‘मिशन पुना आकी’ म्हणजेच ‘मिशन नवी पालवी/सुरवात’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

काय आहे मिशन पुना आकी‘?

भामरागड तालुक्यातील बहुतांश नागरिकांकडे आधार कार्ड  व जन्म दाखला नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना अडचणी येतात. ही कागदपत्रे मिळवण्यासाठी त्यांना तालुक्याच्या फेऱ्या मारणे शक्य नसल्याने लोक टाळाटाळ करतात. परिणामी बरेच लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. तसेच भामरागड तालुक्यातील महिलांच्या आरोग्याशी संबंधित मासिक पाळी स्वच्छता, बालविवाह व संस्थात्मक प्रसूती हे विषय देखील गंभीर आहेत. या समस्या ओळखून पंचायत समिती भामरागड तर्फे ही मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनात व गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत भामरागड मधील सर्व ग्रामपंचायतींमध्ये जून महिन्यात एक दिवसीय शिबिर घेऊन आधार कार्ड, जन्म दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, बॅंक अकाऊंट अशी महत्वाची कागदपत्रे लोकांना दिली जात आहेत. महत्वपूर्ण योजनांची माहिती देत फॉर्म भरून घेतले जात आहेत. तसेच माडिया भाषेतून नाटक सादर करीत महिला आरोग्य व अधिकार यावर प्रबोधन केले जात आहे.

या गावात होणार शिबीर :

आतापर्यंत ‘मिशन पुना आकी’ मोहीम धोडराज, मल्लमपोडूर, विसामुंडी, बिनागुंडा, नेलगुंडा, गोंगवाडा व हालोदंडी इथे राबवण्यात आली आहे. तर जून महिन्यात पल्ली, कोठी, पोयरकोठी, होड्री, लाहेरी, येचली, मन्नेराजाराम, मडवेली, जिंजगाव, इरकडुम्मे, हलवेर, टेकला व आरेवाडा या 13 ठिकाणी  ही मोहीम राबवली जाणार आहे.

अतिदुर्गम बिनागुंडा गावातही झाले शिबीर

‘मिशन पुना आकी’ अंतर्गत पहाडी व गर्द जंगलात वसलेल्या अतिदुर्गम बिनागुंडा या गावात नुकतेच 6 जून रोजी शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर आयोजित करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली मधून परिश्रमपूर्वक आदल्या दिवशी सामान आणावे लागले. बिनागुंडा जवळ असणाऱ्या कुवाकोडी, तुरेमर्का, परमलभट्टी, पुंगासुर व दामनमर्का या गावांनी देखील येथील शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी जन्म दाखल्याकरीता ग्रामपंचायत व पंचायत समितीतून जन्म नोंदणी उपलब्ध नसल्याचे एकूण 62 दाखले देण्यात आले. 24 लाभार्थ्यांना नवीन आधार कार्ड व अपडेट करून दिले. आरोग्य तपासणी पथकाकडून एकूण 92 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच गर्भवतींचे व लहान बालकांचे लसीकरण देखील करण्यात आले. माता व बालकांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या लेक लाडकी, बालसंगोपन, जननी सुरक्षा व प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनांची माहिती देत त्याचा लाभ मिळण्यासाठी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली.

महिलांच्या आरोग्यवर पथनाट्यातून जनजागृती

महिलांचे आरोग्य व अधिकारांविषयी ‘आस्कना अधिकार, विजय किकाल!’ या पथनाट्याचे माडिया भाषेतून सादरीकरण करण्यात आले. मासिक पाळी स्वच्छता याविषयी माहितीच्या अभावामुळे महिलांना होणारे गर्भाशय संबंधित आजार, कुमारी माता व बालविवाहाचे आरोग्यावरील दुष्परिणाम, कुपोषित मुले, माता मृत्यूच्या समस्या टाळण्यासाठी वैद्यकीय रूग्णालयात प्रसूती होण्याचे महत्व,  पारंपारिक कुप्रथेमुळे पाळीतील महिलांच्या आरोग्यावरील थेट प्रभाव,  नवजात बालकासोबत आईला घराबाजूच्या चाप्यात कमी सुविधांमध्ये आठवडाभर राहावं लागत असल्याने दोघांच्याही आरोग्याला निर्माण होणार धोका या सर्व महत्त्वाच्या व गंभीर मुद्द्यांवर या पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली.

            या उपक्रमांतर्गत आतापर्यंतची ग्रामपंचायत व पंचायत समितीचे जन्म नोंदणी उपलब्ध नसल्याचे 783 दाखले, 116 नवीन आधार कार्ड, 357 अधार अपडेट, 937 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी व 61 नवीन बँक खाते तयार करून देण्यात आले.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक, ग्राम पंचायत कर्मचारी, आकांक्षीत तालुका फेलो, आरोग्य तपासणी पथक, रोजगार सेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मोबिलायझर व पथनाट्यातील कलाकार हे सर्व महत्वाची कामगिरी बजावत आहेत.

कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कागदपत्रेविशेषत: आधार कार्ड, बँक खाते, जातीचे प्रमाणपत्र व जन्मदाखला हे महत्त्वाचे असते.. पंचायत समिती भामरागडने आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत अशा योजनांबाबत दस्तऐवज घरोघरी पोहोचवणे आणि महिलांच्या आरोग्यसंबंधात जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.- आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली.