जिल्हा गुंतवणुक परिषदेत होणार व्यापार उदयोगावर चर्चा

जिल्हा गुंतवणुक परिषदेत होणार व्यापार उदयोगावर चर्चा

                भंडारा, दि.29: गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी व जिल्हयातील उदयोग – व्यवसायाच्या संधीचा परिघ विस्तारण्यासाठी  जिल्हा उदयोग केंद्र व  राज्य औदयोगिक महामंडळाच्या संयुक्त विदयमाने उदया व्ही.के .हॉटेल,महाल रोड येथे एक दिवसीय गुंतवणुक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उदयोग वाढीसाठी पोषक वातावरण आणि जिल्हयाचाऔदयोगिक विकास हा या परिषदेमागचा हेतू आहे. पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते या परिषदेचे उदघाटन होईल.

           या गुंतवणुक परिषदेला सकाळी 10 वाजता सुरवात होईल,यामध्ये सहभागी उदयोजकांची नोंदणी  होईल.त्यानंतर  सहसंचालक उदयोग,नागपूर विभाग, गजेंद्र भारती हे प्रास्ताविक करतील. नीती आायोगाच्या सूचनानुसार नियोजन विभागाने केलेल्या जिल्हा विकास आराखडयाबाबत मुख्यमंत्री कार्यालयाचे फेलो निलेश सांळुके हे मार्गदर्शन करतील.त्यानंतर जिल्हयातील गुतंवणुकीच्या संधीबाबत जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर मार्गदर्शन करतील. त्यानंतर जिल्हयातील विविध उदयोगाबाबत सामंजस्य करार उदयोग कंपन्याशी करण्यात येतील.

            गुंतवणुकीला प्रोत्साहन, औद्योगिक सुविधा, व्यवसाय सुलभीकरण व उद्योगांसाठी आवश्यक परवानग्या / मंजुरी आणि सेवा कालमर्यादेत देण्याच्या दृष्टिने कायद्याद्वारे गुंतवणूकदार सुविधा केंद्र/ गुंतवणूक प्रोत्साहन एजन्सी म्हणून एक खिडकी प्रणालीला अधिकार देण्यासाठी उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (मैत्री) कायदयाविषयी या परिषदेत तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करतील.

           त्यानंतर पर्यटन,वनपर्यटनातील गुंतवणुक व उदयोगाच्या संधीविषयी चर्चासत्रात उपवनसंरक्षक पवन जेफ व अन्य मान्यवर सहभागी होतील. त्यानंतर  पितळ व अन्य धातुविषयीच्या बाजारपेठेतील संधीवर  मेटल असोसिएशन भंडारा यांच्याव्दारे समुह चर्चा ही होणार आहे.

             भेाजन अवकाशानंतर जिल्हयातील निर्यातीविषयक संधी  तसेच सिडबी संस्थेमार्फत छोटया उदयोगांना लागणारे वित्तीय पाठबळावरही प्रकाश टाकण्यात येईल तसेच सुक्ष्म, लघु व मोठया उदयोगांच्या विविध योजनांबाबत जिल्हा उदयोग केंद्राव्दारे मार्गदर्शन करण्यात येईल.