जिल्हा औषधी भांडार नवीन इमारतीचे लोकार्पण

जिल्हा औषधी भांडार नवीन इमारतीचे लोकार्पण

चंद्रपूर, दि. 26 :  देशातील विविध आरोग्य सेवा, पायाभुत सुविधा प्रकल्पाची पायाभरणी अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा औषधी भांडारच्या नवीन इमारतीचे लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक संचालक (आरोग्यसेवा) डॉ. आनंद गडीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, सावलीचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बंडू रामटेके, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य पुष्पा पोडे उपस्थित होत्या.

यावेळी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, चंद्रपूर येथे नवीन औषध भांडाराचे तसेच तडाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी – कर्मचारी यांच्या निवासस्थानाचे लोकार्पण करण्यात आले आहे. जिल्ह्यात 65 प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. यात औषधींचा साठा ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. या भांडाराच्या माध्यमातून एक चांगले औषध भांडार जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात आरोग्याच्या पायाभूत सुविधा, विस्तारीकरण, स्मार्ट पी.एच.सी. निर्माण करण्यात येत आहे. शहरातील खाजगी रुग्णालयाच्या धर्तीवर ग्रामीण भागात आरोग्याच्या सेवा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. मंगेश गुलवाडे म्हणाले, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा सर्वांपर्यंत पोहचविण्याचा संकल्प केला आहे. चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात आरोग्याच्या बाबतीत अग्रेसर राहावा, यासाठी पालकमंत्री सदैव प्रयत्नशील आहेत, असे ते म्हणाले.

तत्पूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे देशातील विविध आरोग्य सेवा, पायाभुत सुविधा प्रकल्पाची पायाभरणी / लोकार्पण करण्यात आले. यावेळी चंद्रपूर येथे मान्यवरांच्या हस्ते फित कापून जिल्हा औषधी भांडारच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी तर आभार राकेश नाकोडे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवीन औषधी भांडारमधील सुविधा : नवीन औषधी भांडार मध्ये औषधी साठवणुकीची जास्त क्षमता, मार्गदर्शक सुचनांप्रमाणे औषधाची व्यवस्था, औषधाप्रमाणे खोलीचे तापमान नियंत्रण, पी.एच.सी. व इतर ठिकाणी औषधी साठा वाहतुकीची सोय, फायर फायटींग डिटेक्शन सिस्टीम, पाण्याची सुविधा, शौचालयाची सोय, कोल्ड स्टोरेज रूम, किडे, वाळवी, साप आदींपासून औषधीचे संरक्षण आदी सुविधा येथे करण्यात आल्या आहेत.

जिल्हा औषध भांडार मुळे ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांना औषध पुरवठा करण्याकरीता लागणा-या औषधांचा साठा करण्यास व व्यवस्थित जतन करून वितरीत करण्यास मदत होणार आहे.