शाळांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन स्वरुपात भरणे अनिवार्य

शाळांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन स्वरुपात भरणे अनिवार्य

 जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयातंर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे मैट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्यात येतात व पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ अदा करण्यात येतो. तसेच या कार्यालयामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात.

समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त (शिक्षण) यांच्या आदेशान्वये, जिल्ह्यातील सर्व शाळांनी इयत्ता 9वी व 10वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्तीचे अर्ज तसेच अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती या दोन योजनांचे अर्ज http://prematric.mahait.org/Login/Login  या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात भरणे अनिवार्य आहे.

अर्जांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी कार्यप्रणाली अवलंबिण्यात आली आहे. यामध्ये महाडीबीटी प्रणालीद्वारे http://prematric.mahait.org/Login/Login वर ऑनलाईन स्वरुपात अर्ज भरावेत. मुख्याध्यापक लॉगीन तयार करणे यामध्ये महाडीबीटी पोर्टलवर प्री-मैट्रिक योजनेच्या अर्ज नोंदणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी युजर-आयडीमध्ये Pre_SE२७XXXXXXXXX_Principal आणि पासवर्ड Pass@123 टाईप करून लॉगीन करावे. शाळेचे प्रोफाईल अद्यावत करणे यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांची व लिपिकाची माहिती अद्यावत करावी. विद्यार्थ्यांचे प्रोफाइल अद्यावत करणे यामध्ये विद्यार्थ्याची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अद्यावत करावी. तसेच योजनेची निवड करणे यामध्ये संबंधित विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहे, त्या योजनेकरीता अर्ज नोंदणी करणे.

पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करण्याकरीता सुचना प्राप्त झाल्या असून सदर काम तातडीने पूर्ण करावे. याबाबत काही अडचणी असल्यास जिल्हा समाजकल्याण कार्यालय,जिल्हा परिषद,चंद्रपूर कार्यालयातील 07172-255933 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा कार्यालयात प्रत्यक्ष भेट देवून अडचणी दूर कराव्यात, असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी कळविले आहे.