19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रम

19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रम

Ø नियोजन करून अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनाचे निर्देश

जिल्ह्यामध्ये 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती  उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना जबाबदार अधिकाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या मुद्द्यांचा अंतर्भाव करून सर्वतोपरी प्रयत्न करावेत. उपक्रमा संदर्भात नियोजन करून अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासनाने निर्देश दिले आहे.

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराची स्वच्छता, रंगरंगोटी व सुशोभीकरण करताना जबाबदार अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून काम नियोजित पद्धतीने करून घ्यावे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी/ परिसरात सुयोग्य ठिकाणी राज्य गीताचे फ्लेक्स लावावेत. स्थानिक नद्यांचे स्वच्छ व पवित्र पाणी उपलब्ध झाल्यास पुतळ्यास जलाभिषेक घालावा. पुतळा परिसरात सर्वत्र विद्युत रोषणाई करावी. शक्य झाल्यास परिसरात कायम स्वरूपी विद्युत रोषणाईचे नियोजन करावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहाराबरोबरच कायमस्वरूपी मोत्याचा हार उपलब्ध झाल्यास तो घालावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी पुतळ्यासमोर उपलब्धतेनुसार पोलीस बँड (अर्धा तास) द्वारे राज्यगीत व शिवगीतांची धुन वाजवावी. पुतळा परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात यावी शक्य तेथे फुलाची रांगोळी काढावी. जयंतीच्या दिवशी स्थानिक शाहिरांच्या पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करावा. तसेच स्थानिक ठिकाणी निबंध स्पर्धा, वीर गीतांच्या स्पर्धेचे आयोजन करावे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.