जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा

चंद्रपूर,दि.12: जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन दि. 9 ते 11 फेब्रुवारी 2024 कालावधीत जिल्हा स्टेडीयम, चंद्रपूर येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा हस्ते पार पडले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी रणजित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) श्याम वाखर्डे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजकुमार हिवारे तसेच जिल्हा परीषदेतील विविध विभागाचे प्रमुख,पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.

सदर स्पर्धेमध्ये अॅथलेटिक्स प्रकारातील खेळ जिल्हा स्टेडीयम येथे, तालुका क्रीडा संकुल,विसापूर येथे स्विमिंग व बॅटमिंटन, क्रिकेट हा खेळ ओ.आर.सी.मैदान उर्जानगर येथे तर सांस्कृतिक स्पर्धा सेंट मायकल हायस्कुल सभागृह, रामनगर येथे घेण्यात आल्या. या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. या स्पर्धेत जिल्हा परिषद मुख्यालय संघ अॅथलेटिक्स, सांस्कृतिक व मार्च पास्ट, झांकी आदी प्रकारात सरस कामगिरी केल्यामुळे चॅम्पीयन ट्रॉफीचा मानकरी ठरला. तसेच सदर स्पर्धेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी क्रिकेट, फुटबॉल व बॅडमिंटन आदी खेळामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. त्यासोबतच जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुख व गट विकास अधिकारी यांच्यासमवेत अधिकारी/कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग घेतला.

सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन म्हणाले, जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचारी हे तळागाळातील जनतेच्या सर्वांगीन विकासाची कामे करत असतो. सदर कर्तव्ये पार पाडतांना ते प्रचंड तणावाखाली वावरत असतात. त्या तणावग्रस्त जीवणशैलीतून उसंत मिळण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी खेळ खेळले पाहीजे. जेणेकरून,आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील व त्याचा सकारात्मक परिणाम प्रशासकीय कामकाजावर होईल. जिल्हा परीषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उत्तम नियोजनातुन सदर स्पर्धा उत्साहात पार पडल्या.