मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी 24 ते 31 जानेवारी या कालावधीत घरोघरी सर्व्हेक्षण

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी
24 ते 31 जानेवारी या कालावधीत घरोघरी सर्व्हेक्षण

गडचिरोली,दि.22: मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात 24 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत घरोघरी सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.
मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून नव्याने इंपिरीयल डाटा गोळा करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाने करावयाच्या सर्व्हेक्षणासाठी निकष निश्चित केले असून त्याबाबतची प्रश्नावली अंतिम केली आहे. या सर्व्हेक्षणाच्या कामासाठी व प्रश्नावलीच्या संबंधाने संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांना नोडल अधिकारी म्हणून तर नायब तहसीलदार यांना सहायक नोडल अधिकारी व एका शासकीय कर्मचा-याची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेतलेल्या अधिकारी व कर्मचा-यांकडून सर्व्हेक्षणासाठी तालुक्यात नियुक्त करण्यात आलेले प्रगणक व पर्यवेक्षक यांना दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने 24 जानेवारी 2024 पासून प्रत्येक तालुक्यात प्रत्यक्ष सर्व्हेक्षणाला सुरवात होणार आहे.
सदर सर्व्हेक्षण विहित मुदतीत पूर्ण करावयाचे असल्याने 24 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत सर्व्हेक्षणासाठी आपल्या घरी आलेल्या प्रगणकाने विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे देऊन प्रगणकाला सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी केले आहे.