जिल्हा उद्योग केंद्राच्या नावाने दिशाभूल करणाऱ्यांपासून सावधान

जिल्हा उद्योग केंद्राच्या नावाने दिशाभूल करणाऱ्यांपासून सावधान

भंडारा, दि. 19 : जिल्हा उद्योग केंद्राव्दारे कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. तरी कर्ज मंजुरीचे अधिकार बॅकांना असून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीपासून दक्ष राहावे. असे काही प्रकार घडत असल्यास पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन महाव्यवस्थापक श्री. बदर यांनी केले आहे.

जिल्हा उद्योग केंद्राव्दारे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या कर्जाच्या योजना राबविल्या जातात. या दोन्ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविल्या जातात. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी जिल्ह्यास 450 केसेसचे उद्दिष्ट होते. त्यामध्ये अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करण्यास मार्गदर्शन करण्यात येत आहे. अर्ज परीपूर्ण असल्यास जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्य समितीचे शिफारसीने बॅंकेकडे पाठविले जातात. बॅंकेने मंजूर केलेल्या कर्जाच्या प्रमाणात शहरी /ग्रामीण व खुला आरक्षित प्रवर्गानुसार 15 ते 35 टक्के अनुदान दिले जाते.

या योजनेमध्ये कर्ज मंजुरीचे सर्वस्वी अधिकार बॅंकांना आहेत. परंतु जिल्ह्यामध्ये काही व्यक्ती त्यांमध्ये महिलांचा समावेश आहे. हे लोकांची दिशाभुल करून त्यांचेकडून या कार्यालयाच्या नावाने कर्ज मंजूर करून देतो म्हणून पैसे उकळीत आहेत. या प्रकाराशी जिल्हा उद्योग केंद्राचा कोणताही संबंध नाही व असे प्रकार घडत असल्यास पोलिसांकडे तक्रार करावी, असे जिल्हा उद्योग केंद्राने कळविले आहे.