आदिम कोलाम लाभार्थींना विविध प्रमाणपत्रांचे वितरण Ø प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान

आदिम कोलाम लाभार्थींना विविध प्रमाणपत्रांचे वितरण

Ø प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान

चंद्रपूर, दि. 5 : धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांचे जयंतीचे औचित्य साधून देशातील आदिम जमातींच्या विकासाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान अर्थात पी.एम. जनमन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. देशातील एकूण 75 आदिम जमातींमधील 7 लाख कुटुंबांतील 28 लाख आदिम लोकांना 11 प्रकारच्या विविध मूलभूत सेवा प्रदान करण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वयन समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यात सदर अभियानाची सुरुवात राजुरा तालुक्यातील लाईनगुडा या आदीम कोलाम जमातीच्या वस्तीवर विविध सेवांचे शिबिर आयोजनाने करण्यात आली. तर कोरपना तालुक्यातील कमलापूर येथे 260 कुटुंबातील 580 लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र व वैयक्तिक योजनेचा लाभ देण्यात आला. या अभियानांतर्गत प्रथम चरणात लाभार्थ्यांचे आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जातीचे दाखले, जनधन खाते, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, मतदान कार्ड, किसान क्रेडीट कार्ड,  रेशन कार्ड इत्यादी दाखले काढण्यात आले आहेत.

पी.एम. जनमन योजनेची प्रमुख उद्दिष्टे : आदिम जमातीतील कुटुंबांना पक्के घर देणे, नल से जल योजनेअंतर्गत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविणे, पाडे / वस्त्यांना पक्क्या रस्त्याने जोडणे, प्रत्येक घराला मोफत विद्युत मीटर देऊन वीजपुरवठा करणे, पोषण आहार आणि आरोग्य सुविधा पुरविणे, वस्त्या / पाडे मोबाईल आणि इंटरनेट सेवेने जोडणे, बेरोजगारांसाठी कौशल्य विकासाच्या योजना राबविणे, विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह सुविधा देणे, उपजीविकेच्या साधनांची निर्मिती करणे, वैयक्तिक वन हक्क दावेधारकांना पीएम किसान योजनेचा लाभ देणे, वस्त्यांवर बहुउद्देशीय केंद्र स्थापन करून त्यात अंगणवाडी  आणि आरोग्य केंद्र सुरू करणे;  यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमणे, ही पी.एम. जनमन योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.

या ठिकाणी होणार शिबिरांचे आयोजन : चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 1 हजार आदिम समुदाय असून या समुदायाला 100 टक्के शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी राजुरा, जिवती, कोरपना, वरोरा तालुक्यातील विविध गावांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 6 जानेवारी रोजी जिवती तालुक्यातील घुडसेला, दामपूर मोहाडा, टेकामांडवा येथे, राजुरा तालुक्यातील गोट्टा येथे, वरोरा तालुक्यातील दिंडोदा (खुर्द) येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 7 जानेवारी रोजी जिवती तालुक्यातील आंबेझरी, धनकदेवी, मार्कलमेटा, कोरपना तालुक्यातील बेलगाव, राजुरा तालुक्यातील शांतीनगर येथे 8 जानेवारी रोजी जिवती तालुक्यातील खडकी रायपूर आणि भारी, कोरपना तालुक्यातील तांगडा येथे तर 9 जानेवारी रोजी जिवती तालुक्यातील शेणगाव येथे शिबीर आयोजित आहे.

लाभ घेण्याचे आवाहन : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूरद्वारे जिल्ह्यात आदिवासींसाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात. या योजनांचा तसेच वरील ठिकाणी असलेल्या शिबिराला आदिम समुदायाने उपस्थित राहून आवश्यक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी केले आहे.