शेतकरी सन्मान योजनेची तिसरी यादी प्रसिध्द

शेतकरी सन्मान योजनेची तिसरी यादी प्रसिध्द

 

भंडारा, दि. 26 : शेतकरी सन्मान योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची यादी नुकतीच प्रसिध्द करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव तिसऱ्या तिसऱ्या यादीत आलेले आहेत अशा शेतकऱ्यांची यादी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा, राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत, चावडी, तालुका सहाय्यक कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तिसऱ्या यादीमध्ये एकूण 9 हजार 964 लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 47 हजार 585 लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली असून 32 हजार 583 लाभार्थ्यांना 108.66 कोटी रूपये लाभ देण्यात आला आहे.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान योजना 2019 अंतर्गत सन 2017-18 ते 2019-2020 या तीन आर्थीक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थीक वर्षात पिक कर्जाची उचल करून विहीत मुदतीत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी सदर कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पिक कर्जाच्या मुद्दल रक्कमेवर जास्तीत जास्त 50 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

तरी लाभार्थी शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा व राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखा तसेच आपले सरकार सेवा केंद्र येथे आधार कार्ड व बँक पासबूक घेवून जावून प्रमाणिकरण करून घ्यावे व सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था एस.पी.कांबळे यांनी केले आहे.