वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे धान खरेदी नोंदणीची मुदत वाढविली

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे धान खरेदी नोंदणीची मुदत वाढविली

राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार लाभ; मागणी करताच काही तासातच निघाला शासन निर्णय

चंद्रपूर, दि.२९ : खरेदी केंद्रांची मोजकी संख्या आणि इंटरनेट नेटवर्कची समस्या यामुळे शेतकऱ्यांची धान खरेदी नोंदणी पुरेशी झालेली नसल्यामुळे नोंदणीची मुदत १५ जानेवारी २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पाठपुरावा केला होता, त्या पाठपुराव्याला काही तासातच यश आले असून शासन निर्णय निर्गमित झाला आहे.

शेतकरी बांधव आधारभूत किमंत योजनेअंतर्गत नेमण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर नोंदणी करून धान व भरडधान्य विक्री करतात. जिल्ह्यात केंद्रांची संख्या फार मोजकी आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यात धान व भरडधान्य मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते त्या जिल्ह्याला या खरेदी नोंदणीच्या मिळालेल्या मुदतवाढीमुळे लाभ होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी याबाबत मागणी केली होती. या मागणीचे गांभीर्य लक्ष्यात घेत वन व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी धान नोंदणीची मुदत ताबडतोब वाढविण्यात यावी, असा आग्रह केला.

यासंदर्भात ना. श्री. मुनगंटीवार यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगनजी भुजबळ यांना पत्र लिहत आग्रही मागणी केली . ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पत्राची दखल घेत श्री. भुजबळ यांनी संबंधित विभागाला काही तासातच आदेश निर्गमित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार धान नोंदणीची मुदत आता १५ जानेवारी २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. काही तासातच केलेल्या मागणीला न्याय मिळाल्याने शेतकऱ्यांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले आहे.