सिंदेवाही पंचायत समिती परिसरात बिबट्याचा धुमाकूळ ◾ बिबट्याला पकडण्याचे वनविभागाचे शर्तीचे प्रयत्न..

सिंदेवाही पंचायत समिती परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

◾ बिबट्याला पकडण्याचे वनविभागाचे शर्तीचे प्रयत्न..

सिंदेवाही :- मागील आठवड्याभरा पासून सिंदेवाही पंचायत समिती परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्या मुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी “मॉर्निंग वॉक”साठी जाणाऱ्या नागरिकांना आणि सायंकाळीं परिसरातील अनेकांना बिबट्याचे रोज दर्शन होत असल्याने अखेर वनविभाग कडून बिबट्याला पकडण्यासाठी कॅमेरे लावून पिंजरे ठेवण्यात आले आहेत.
सिंदेवाही पंचायत समिती परिसरात आजूबाजूला झुडपी जंगल असून याच परिसरातील घोडझरी जलसंपदा विभागाच्या कार्यालय जवळ बिबट्याचे बस्तान असल्याचे नागरिकांत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. अशातच मागील आठवड्यापासून पंचायत समितीच्या परिसरात अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले असून सकाळी मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या नागरिकांना रोज दर्शन होत असल्याने भीती निर्माण झाली आहे. दरम्यान याबाबतची माहिती सिंदेवाही वनपरिक्षेत्र कार्यालयात देण्यात आली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांचे नेतृत्वात कार्यालयातील कर्मचारी यांनी पंचायत समितीच्या परिसरात सहा कॅमेरे लावले असून बिबट्याला ट्रॅप करण्यासाठी दोन ठिकाणी पिंजरे सुद्धा ठेवण्यात आले असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. असे असले तरी बिबट्याची भ्रमंती परिसरात सुरू असल्याने लोनवाही, रेल्वे स्टेशन परिसर , या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या शर्तीच्या प्रयत्नात बिबट्या कॅमेरा मध्ये कैद होणार की, थेट पिंजऱ्यात ट्रॅप होणार? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.