गडचिरोली जिल्ह्यात 144 कलम लागू

गडचिरोली जिल्ह्यात 144 कलम लागू

गडचिरोली, दि.22: जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट –क ची रिक्त पदे भरण्यास्तव शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड, कन्नमवार नगर, गडचिरोली या परिक्षा केंद्रावर दिनांक 18,19, 20,21,23,24 व 26 डिसेंबर 2023 रोजी उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. परिक्षा केंद्रावर परिक्षा शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी परिक्षा केंद्रांच्या परिसरात 200 मीटर अंतरापर्यंत फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सदर परिक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाडण्याच्या दृष्टीने सदर परिक्षा केंद्राच्या 200 मिटर अंतरापर्यंत पुढीलप्रमाणे बाबी/कृत्ये करण्यास मनाई आदेश जारी केले आहे.
निषिद्ध क्षेत्रात झेरॉक्स मशीन, फॅक्स, व एस टी डी बुथ, परिक्षा कालावधीत सुरु राहणार नाही. परिक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन, लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा इत्यादींचा वापर करता येणार नाही. निषिद्ध क्षेत्रात नारेबाजी करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, भाषण करणे, घोषणा करता येणार नाही. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाहीत. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर ठेवता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेता, येणार नाही. परिक्षा केंद्रापासून 200 मीटर अंतरावर चुन्याची लाईन आखण्यात यावी.
सदर आदेश कर्तव्य बजावणारे वरिष्ठ अधिकारी, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना लागू राहणार नाही. पोलीस अधिक्षक, गडचिरोली यांनी परिक्षेच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करून आवश्यक पोलीस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही व जबाबदारी पार पाडावी. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध फौजदारी नियमांतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. सदर अधिसूचना परिक्षेच्या दिनांकास रात्री 12.01 ते रात्री 08.00 वाजेपर्यंत अमलात राहील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांनी कळविले आहे.