निंदाव्यंजक ठराव मांडण्याची परवानगी द्या

निंदाव्यंजक ठराव मांडण्याची परवानगी द्या

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

नागपूर,15:- शेतकऱ्यांप्रती शासनाच्या असलेल्या उदासिनतेमुळे निंदाव्यंजक ठराव सभागृहात मांडण्याची परवानगी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे मागितली आहे.

अतिवृष्टी, दुष्काळ व अवकाळीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याबाबत सोमवार, दिनांक ११ डिसेंबर, २०२३ रोजी सभागृहात महाराष्ट्र विधानसभा नियम १०१ अन्वये अल्पकालिन चर्चा उपस्थित करण्यात आली. या प्रस्तावावर विधानसभा सभागृहात सोमवार, दिनांक ११ डिसेंबर, २०२३ व मंगळवार, २०२३ रोजी सर्वपक्षीय चर्चा करण्यात आली. राज्यात झालेली अतिवृष्टी, त्यानंतर पडलेला दुष्काळ व त्यानंतर अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी संकटात आहे. अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. पीक विमा कंपन्यांच्या मुजोरपणामुळे शेतकरी पीक विम्यापासूनही वंचित राहीला आहे. याबाबत तातडीने रोख मदत जाहीर करण्याची आवश्यकता असल्याने चर्चेच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करण्यात आली.

विधानसभेच्या प्रचलित प्रथा व परंपरेनुसार या प्रस्तावावर सभागृहात चर्चा संपल्याबरोबर संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांनी त्यास ठोस उत्तर देणे अपेक्षित असते. परंतु या प्रस्तावावर चर्चा होऊन चार दिवस उलटले असून शेतकरी हवालदील झालेला असतानाही शासनाकडून कोणतेही उत्तर सभागृहास देण्यात आलेले नाही. कोणतीही मदत नुकसानग्रस्तांस करण्यात आलेली नाही. यावरुन शेतकऱ्यांप्रती शासनाच्या असलेल्या उदासिनतेमुळे निंदाव्यंजक ठराव सभागृहात मांडण्याची परवानगी मागितली आहे.