फिजिशियन अँड सर्जन कॉलेजेस बंद करण्याच्या प्रकरणाची चौकशी करावी : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

फिजिशियन अँड सर्जन कॉलेजेस बंद करण्याच्या प्रकरणाची चौकशी करावी : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

नागपूर, दि. ११- केंद्रीय कुटुंब कल्याण मंत्रालयाने परवानगी देऊनही महाराष्ट्र वैद्यक परिषदेने राज्यातील १२० पैकी ४४ फिजिशियन अँड सर्जन कॉलेजेस बंद करण्याचा आदेश दिला आहे. एकीकडे राज्यातील उद्योग बंद पाडून इतर राज्यात लावण्याचा प्रकार यामध्येही होत नाही ना, असा सवाल आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत राज्य सरकारला केला. मात्र, या निर्णयामुळे दरवर्षी २२०० विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

विधानसभेत आज श्री. वडेट्टीवार यांनी या कॉलेजेस संदर्भातील मुद्दा उपस्थित केला. भारतीय वैद्यक परिषद आणि महाराष्ट्र वैद्यक परिषदेने या फिजिशियन अँड सर्जन कॉलेजेसला परवानगी दिली आहे. राज्य शासनालाही याबाबत परवानगी देण्याचे अधिकार आहेत. असे असताना महाराष्ट्र वैद्यक परिषदेने अचानक या १२० पैकी ४० कॉलेजेसची तपासणी केली. याप्रकरणी कोणतीही नोटीस देण्यात आली नाही. कोणतीही पूर्वकल्पना त्यांना देण्यात आली नाही. इतक्या वर्षात ही कॉलेजेस सुरू असताना अशा प्रकारची कारवाई यापूर्वी कधीच झालेली नाही. त्यामुळे अचानक अशा प्रकारची कारवाई कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, त्याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

वास्तविक कोणत्याही संस्थेत काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्याची संधी दिली जाते. मात्र, या प्रकरणात अशी कोणतीही बाजू मांडण्याची संधी या कॉलेजेसला देण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी केली.