हत्तीप्रमाणेच रानडुकरांचा उपद्रव वाढला. राज्य सरकारने रानडुकरांचा बंदोबस्त करावा…

हत्तीप्रमाणेच रानडुकरांचा उपद्रव वाढला. राज्य सरकारने रानडुकरांचा बंदोबस्त करावा

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

नागपूर ११ :- मागील पाच-सहा महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात हत्तीचा वावर वाढला आहे. वाघ आणि हत्तीच्या हल्यात आतापर्यंत गडचिरोलीत १० लोकांचा मुत्यू झाला आहे. तर, ब्रम्हपुरीमध्ये ६० लोकांचा मृत्यू झाला आहे. हत्तीमुळे लोक गावात फिरु शकत नाहीत. जंगली प्राण्यांमुळे शेतमालांचे मोठया प्रमाणावर नुकसान होत असुन आता रानडुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरी, या रानडुकरांवरील प्रेम बाजूला सारून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत पुरवणी मागणीवर बोलताना केली.

पुरवणी मागणीवर बोलताना श्री वडेट्टीवार म्हणाले, मागील पाच-सहा महिन्यांपासून गडचिरोली जिल्हयात हत्तींचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे. वाघ आणि हत्तीच्या हल्यात गडचिरोलीत १० तर, ब्रम्हपुरीमध्ये ६० लोकांचा मृत्यू झाला आहे. हत्तीच्या दहशतीमुळे लोक गावात मुक्तपणे फिरु शकत नाहीत. जंगली प्राण्यांमुळे शेतमालांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असुन रान डुक्कर शेतमालाची नासधुस करत आहेत. या रानडुकरांचा बंदोबस्त राज्य शासनाने करावा.

विद्यमान सरकारचे या रानडुकरांवर अति प्रेम असल्यामुळे त्यांना मारण्याची परवानगी दिली जात नाही. परंतु, यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान होत आहे. तरी, हे प्रेम बाजूला सारून वन्यप्राण्यांमध्ये या रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते श्री.वडेट्टीवार यांनी केली.