विशेष पुनरिक्षण मोहिम कामकाज निरिक्षणासाठी विभागीय आयुक्त यांची 4 डिसेंबरला जिल्ह्यात भेट

विशेष पुनरिक्षण मोहिम कामकाज निरिक्षणासाठी

विभागीय आयुक्त यांची 4 डिसेंबरला जिल्ह्यात भेट

भंडारा, दि.29: भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त नागपूर श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांना मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

या पुनरिक्षण कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत मतदार यादी निरीक्षकांच्या जिल्हानिहाय तीन भेटींचे आयोजन असून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे दावे व हरकती सादर करण्याच्या कालावधीत पहिली भेट, दावे व हरकती निकाली काढण्याच्या कालावधीत दुसरी भेट आणि मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या कालावधीत तिसरी भेट आयोजित आहे.

भंडारा जिल्हयातील पहिल्या भेटी च्या अनुषंगाने दि.04 डिसेंबर, २०२३ रोजी दुपारी 12.15 वा. परिषद कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार आणि सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे प्रभारी जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी कळविले आहे.