सिनाळा ग्रामवासियांना मिळाली बँकेच्या योजनांची माहिती

सिनाळा ग्रामवासियांना मिळाली बँकेच्या योजनांची माहिती

Ø जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक व बँक ऑफ इंडियाद्वारे सतर्कता सप्ताहाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 9 : जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक व बँक ऑफ इंडिया, पद्मापूर शाखेद्वारा दुर्गापुर क्षेत्रातील संयुक्त ग्राम सिनाळा येथे केंद्रीय सतर्कता विभागाच्या निर्देशानुसार सतर्कता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला नागपूर,आरबीआयचे अग्रणी जिल्हा अधिकारी राजकुमार जयस्वाल, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगडे, बँक ऑफ इंडिया पद्मापूरचे शाखा प्रबंधक अजय दुर्गे, सिनाळाच्या सरपंच सरिता नरुले, निखिल खोब्रागडे, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व गावातील नागरीकांची उपस्थिती होती.

आरबीआयचे अग्रणी जिल्हा अधिकारी राजकुमार जयस्वाल यांनी वित्तीय साक्षरता अभियानांतर्गत, सुरक्षित बँक व्यवहार, बचत आणि त्याचे नियोजन, मोबाइलद्वारे डिजिटल व्यवहारांमध्ये होणारी फसवणूक, अज्ञानामुळे आणि ओटीपी-पासवर्ड यासारखी गोपनीय माहिती शेअर केल्यामुळे कष्टाने कमावलेल्या भांडवलाचे आर्थिक नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी संसाधनाची माहिती उपस्थितांना समजावून सांगितली.

जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक प्रशांत धोंगडे यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांवर आधारित शिबिराचे आयोजन तसेच सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जनधन योजना, सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजनेअंतर्गत नोंदणी करणे तसेच किसान क्रेडीट कार्ड, पिक कर्ज, जनधन खाते उघडून सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी त्यांनी बँकेच्या योजनाविषयी सविस्तर माहिती दिली.