निवृत्त शिक्षिकेने घेतला अभ्यासिका बांधण्याचा ध्यास! – भिक्खू निवासासाठी जमीन दिली दान

निवृत्त शिक्षिकेने घेतला अभ्यासिका बांधण्याचा ध्यास!
– भिक्खू निवासासाठी जमीन दिली दान
भारतीय बौद्ध विचार परंपरेत दान देण्याला विशेष महत्व आहे. श्रावस्तीचे अनाथपिंडक हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे. त्यातही समाजामध्ये चांगल्या उपक्रमाला खुल्या मनाने दान देण्याऱ्या दात्यांची संख्या फार मोठी आहे. एकदा का समाज हितासाठी कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती “हे खरंच उत्तम कार्य करीत आहेत” असा विश्वास बसला की देणारे हात स्वतः पुढे येऊन मदत करण्यास तत्पर असतात. जीवक फाउंडेशन ही सामाजिक संस्था राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सिंदेवाही येथे कार्य करीत आहे. संस्थेच्या कार्याच्या याच विश्वासापोटी निवृत्त शिक्षिका इंदिराबाई डांगे यांनी अभ्यासिका आणि भिक्खू निवास बांधून देण्याचा संकल्प केला. शिक्षणाचे महत्त्व एका शिक्षिकेपेक्षा कोण चांगले ओळखणार. यासाठी या निवृत्त शिक्षिकेने आपली जमीन दान दिली. 28 ऑक्टोबर हा या आईचा वाढदिवस आणि वर्षावास समाप्ती या शुभ दिनाचे औचित्य साधून भूमीपूजनाचा मंगलमय सोहळा पार पडला. याप्रसंगी मुलगा निखिल डांगे, सून शीतल डांगे, मुलगी, जावई, नातवंड, व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.