मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली
नियोजन भवन यथे जिल्हा परिषदेची आढावा बैठक संपन्न
गडचिरोली, दि.23: २२ सप्टेंबर २०२३, रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे नियोजन भवनमध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीकरिता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती लाभली. नियोजन भवन येथे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आगमन झाल्यावर सर्वप्रथम भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला फुलांचा हार अर्पण करून व त्यांना वंदन करून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. या नंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम घेण्यात आला. या नंतर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्या अंतर्गत सामान्य प्रशासन, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, कृषी, शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, महिला व बाल कल्याण तसेच लघुपाटबंधारे या विभागांनी त्यांचे प्रगती अहवाल मा. मंत्री तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह यांचे समोर सादर केले.
या प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्ण गजबे, माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) शेखर शेलार, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक फरेंद्र कुतीरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दावल साळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) अर्चना इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.
अमृत कलश यात्रा-
स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात साजऱ्या होणाऱ्या मेरी माटी मेरा देश या उपक्रम अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातील गावागावात अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील घरातून मुठ भर माती किंवा चिमुटभर तांदूळ अमृत कलश मध्ये जमा करण्यात येत आहेत. सदर सर्व अमृत कलश हे तालुक्यावर एकत्रित करून प्रत्येक तालुक्याचा एक प्रातिनिधिक अमृत कलश राज्य राजधानी मुंबई येथील २७ ऑक्टोबर २०२३ च्या कार्यक्रमात सामील होऊन नंतर केंद्र राजधानी दिल्ली येथे माननीय पंतप्रधान यांचे अध्यक्षतेत कर्तव्य पथवर होणाऱ्या २७ ते ३० ऑक्टोबर च्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सामील होऊन अमृतवाटिकेत समाविष्ट होणार आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली पंचायत समिती मार्फत नेल्या जाणाऱ्या अमृत कलशमध्ये कार्यक्रमातील हजर सर्व मान्यवर अन्न व औषध प्रशासन मंत्री, महाराष्ट्र शासन, धर्मरावबाबा आत्राम, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्ण गजबे, माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) शेखर शेलार, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक फरेंद्र कुतीरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी दावल साळवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) अर्चना इंगोले यांनी मुठभर माती जमा करून गडचिरोली जिल्ह्याकरिता आपले योगदान नोंदविले.
गडचिरोली येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम-
दिनांक २२ सप्टेंबर २०२३ ला नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रम व इयत्ता दहावी बारावी मध्ये मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे शुभहस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पूजन करून उद्घाटन करण्यात आले. प्राथमिक विभागात मधून प्रत्येक पंचायत समिती निहाय एक याप्रमाणे 11 प्राथमिक शिक्षकांना व माध्यमिक विभागातून 1 माध्यमिक शिक्षकाला जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मंत्री महोदय यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आले व सपत्नीक शाल, साडी चोळी, शिल्ड प्रदान करून सत्कार करण्यात आले
इयत्ता दहावी परीक्षा २०२३ मध्ये अनुक्रमे प्रथम येणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5000 रुपये व इयत्ता बारावी कला, विज्ञान, वाणिज्य या प्रत्येक शाखेतून गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5000 रुपये पारितोषिक, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील 4 शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. त्या शिक्षकांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच एम. पी. एस. सी. परीक्षेमध्ये यश मिळविलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तर अत्यंत महत्त्वाचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजगाटा चेक या शाळेची संपूर्ण रंगरंगोटी विनामूल्य करून सामाजिक संदेश रुजविणारे सामान्य नागरिक यांचाही याप्रसंगी मंत्री महोदयांच्या शुभहस्ते जिल्हा परिषद गडचिरोली द्वारा सत्कार करण्यात आले.
3 रुग्णवाहिकांचे लोकार्पण-
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत जिल्ह्यात नव्याने स्थापित प्रा.आ.केंद्र, रंगय्यापल्ली -तालुका सिरोंचा; प्रा.आ.केंद्र पिपली बुर्गी- तालुका एटापल्ली व चामोर्शी तालुक्यातील प्रा.आ.केंद्र लखमापूर बोरी, या आरोग्य संस्थांकरिता ३ रुग्णवाहिका सन २०२२-२३ अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) निधीमधून खरेदी करण्यात आल्या आहेत. सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण अन्न व औषध प्रशासन मंत्री, महाराष्ट्र शासन, धर्मरावबाबा आत्राम, यांचे शुभहस्ते करण्यात आले.