जिल्हयात 16 ऑक्टोबरपर्यत सेवा महिना,सेवा महिन्यात प्रलंबित अर्जाचा होणार निपटारा

जिल्हयात 16 ऑक्टोबरपर्यत सेवा महिना

सेवा महिन्यात प्रलंबित अर्जाचा होणार निपटारा

 भंडारा दि. 18: जिल्हयात पुढील महिनाभर म्हणजे 16 ऑक्टोबरपर्यंत राज्यात सेवा महिना राबवण्यात येणार आहे.यामध्ये प्रलंबित अर्जाचा निपटारा होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक घेण्यात आली.  याबाबत निघालेल्या शासन निर्णयात नमुद केलेल्या  विभागांनी या सेवा महिना उपक्रमात गतीने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या विविध क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबत नागरिकांना मोठ्या प्रमाणावर माहिती प्राप्त करून देणे, त्यांना विविध योजनांचा योग्य लाभ घेता येण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी. यासाठी सेवा महिना अंतर्गत विशेष मोहिम आणि लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात येणार आहे.

या सेवा महिन्याच्या कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र, सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), विभागाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या आणि प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात येणार आहे. सखी किट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी सेवांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्यात येणार आहे. यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे. सर्व विभागप्रमुखांनी याबाबतच्या प्रगतीचा अहवाल नियमीतरित्या देण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले.या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकेाटी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके व अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.