महामंडळाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्या- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

महामंडळाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्या– जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

          भंडारा, दि. 14 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी महामंडळाकडे अर्ज करावेत व जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा. अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकाऱ्यांनीही प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

        ज्यांच्यासाठी कोणतेही महामंडळ नाही अशा बेरोजगार उमेदवारांसाठी एक हक्काचे महामंडळ म्हणजेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ होय. या महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपद्धती ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे.

          जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या मराठा व ज्या प्रवर्गाकरीता इतर स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही, अशा बेरोजगार उमेदवारांनी या महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा. या महामंडळाद्वारे वैयक्तिक कर्ज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज या तीन योजना प्रामुख्याने राबविल्या जातात.

       योजना लाभार्थीभिमुख असून जोपर्यंत आवश्यक माहिती www.udyog.mahaswayam.gov.in या वेब प्रणालीवर अपलोड करीत नाही तोपर्यंत कार्यवाही करता येत नाही. उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ संपर्क साधावा.