अर्थव्यवस्था अभियान-2023 अंतर्गत शालेय जनजागृती कार्यक्रम

अर्थव्यवस्था अभियान-2023 अंतर्गत शालेय जनजागृती कार्यक्रम

गडचिरोली, दि.03: खाण मंत्रालय आणि पोलाद मंत्रालय, जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट आणि डिझाइन सेंटर (जेएनएआरडीडीसी), नाल्को, एनएमडीसी, एमएसटीसी आणि एमआरएआय यांच्या सहकार्याने वर्तुळाकार अर्थव्यवस्था मोहिमेची मालिका आयोजित करण्यात येत आहे. सदर मोहीम भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आली असून पर्यावरणासाठी टिकाऊपणा/जीवनशैली वर आधारित आहे.
मेटल क्षेत्रातील वर्तुळाकार अर्थव्यवस्थेबद्दल जागरूकता आणण्यासाठी, जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट आणि डिझाइन सेंटर विदर्भातील 11 जिल्ह्यांतील 22 शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या मालिकेतील 11 वा आणि शेवटचा कार्यक्रम गडचिरोलीत पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी (प्रभारी) धनाजी पाटील, डॉ. पी. जी. भुक्ते, जेएनएआरडीडीसीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मो. नजर, शिक्षणाधिकारी श्री. निकम, कमलताई मुनघाटे हायस्कूलचे अध्यक्ष एस.लडके यांच्यासह कमलताई मुनघाटे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी डॉ. पी. जी. भुक्ते आणि जेएनएआरडीडीसीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. मो. नजर यांनी मेटल रिसायकलिंग आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर थोडक्यात सादरीकरण केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी (प्रभारी) धनाजी पाटील म्हणाले, लोकांपर्यंत पोहचून लहान मुलांमध्ये वर्तुळाकार अर्थव्यवस्थेबाबत जागृती निर्माण करणे हा एक स्त्युत्य उपक्रम आहे.
कार्यक्रमाचे संचालन जेएनएआरडीडीसीच्या श्रीमती आर. विशाखा, यांनी केले. या कार्यक्रमात सुमारे 310 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि सर्वोत्कृष्ट पाच प्रदर्शन आणि रेखाचित्रांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रमाणपत्रे देण्यात आली.