शैक्षणीक संस्था व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे -कौशल्य विकास विभागाचे आवाहन

महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमामध्ये शैक्षणीक संस्था व

विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे कौशल्य विकास विभागाचे आवाहन

           भंडारा,दि.31 :राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरवणे हे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे मुख्य उद्दिष्ट आहे.राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत “महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण २०१८” जाहीर करण्यात आले आहे.

           सदर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. सदर धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासाकरिता पोषक वातावरणनिर्मिती करुन त्यातून यशस्वी नवउद्योजक घडविण्याकरिता इनक्युबेटर्सची स्थापना व विस्तार, गुणवत्ता परीक्षण व स्टार्टअप्सना बौद्धिक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रँड चॅलेंज, स्टार्टअप वीक यांसारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

          महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजव्दारे नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचा शासनाचा मानस आहे.राज्यातील कोणत्याही महाविद्यालय अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी/विद्यार्थिनी/जास्तीत जास्त 3 विद्यार्थ्यांचा समूह  यासाठी पात्र राहतील.

अर्ज करण्यासाठी विद्यार्थी/विद्यार्थिनी /समूहाकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे.

           उपक्रमाचे टप्पे- टप्पा १: संस्थांची नोंदणी व संस्थास्तरावर संकल्पनांची निवड,टप्पा २: जिल्हास्तरीय सादरीकरण व संकल्पनांची निवड,टप्पा ३: विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम लाभ व पारितोषिकेजिल्हास्तरावर १० विजेत्यांना प्रत्येकी रु. १ लाखांचे बीज भांडवल राज्यस्तरावर १० विजेत्या नवउद्योजकांना प्रत्येकी रु. ५ लाखांचे बीज भांडवल विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम इतर योजनांचा लाभ शैक्षणिक संस्था आणि जिल्ह्यांना पारितोषिके जिल्हयातील शासकीय व खासगी विद्यापीठांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व शैक्षणिक संस्था तसेच शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी या उपक्रमासाठी https://schemes.msins.in/  या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

        नोंदणीनंतर शैक्षणीक संस्थांमधील/औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागासाठी प्रवृत करावे. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज बाबत नोंदणी प्रक्रिया व अधिक माहिती महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या अधिकृत संकेतस्थळ www.msins.in व https://schemes.msins.in वर उपलब्ध आहे. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजच्या माध्यमातून राज्याच्या स्टार्टअप व नाविन्यता परिसंस्थेस अजून बळकटी मिळेल व त्या माध्यमातून जिल्हयातील जास्तीत जास्त विद्यार्थी नवउद्योजकांना आपल्या नवसंकल्पना सादर करण्याची संधी मिळेल यासाठी शैक्षणीक संस्था व विद्यार्थी यांनी वरील वेबपोर्टलवर जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त, सुधाकर झळके यांनी केले आहे.