पावसाळ्यात घ्या आरोग्याची काळजी  – जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक

पावसाळ्यात घ्या आरोग्याची काळजी  – जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक

गडचिरोली, दि.08:    पावसाचा आनंद घेताना आरोग्याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. वातावरणातील दमटपणा, थोडाफार गारवा तसेच सतत पडणारा पाऊस यामुळे यामुळे डासोत्पती स्थानामध्ये वाढ होऊन हिवताप व इतर किटकजन्य आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे नागरिकांनी किटकजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर हा काळ हिवताप व इतर किटकजन्य आजारांसाठी पारेषण काळ आहे. या काळात डबके, नाली, खड्डे इत्यादी ठिकाणी पाणी साचते व डासोत्पती स्थानात वाढ होते व त्यामुळे  किटकजन्य आजारांचा प्रसार होतो.

हिवताप – या आजाराचा प्रसार ॲनाफिलीस डासाच्या मादीपासून होतो. ही मादी स्वच्छ साचलेल्या पाण्यावर अंडी घालते. जसे घराच्या छतावरील मडकी, टायर्स, कप, साचलेले डबके इत्यादी.

लक्षणे – रुग्णास कडाडून थंडी वाजणे, थंडीनंतर रुग्णास 102-105 डेंग्री सेल्सीयसपर्यंत ताप येणे. डोके दुखणे, रुग्ण अर्धवट शुद्धी किंवा बेशुद्ध होणे, ठराविक कालावधीनंतर ताप चढणे किंवा पुन्हा उतरणे.

डेंगू ताप – विषाणुमुळे प्रसरणारा ताप आहे.  दरवर्षी लाखो लोक या आजाराने ग्रस्त असतात त्यापैकी 5 टक्के लोक या आजाराचे बळी पडतात. डेंगी ताप या आजाराची लागण एडीस इजिप्तीस नावाच्या डासाच्या मादीमार्फत होते. हे डास ओळखण्यासाठी त्याचा काळा रंग व त्याच्या पायावरील पांढरे पट्टे टायगर बॅन्ड लक्ष वेधून घेतात.

लक्षणे – डोके दुखी, थंडी वाजून ताप येणे, तीव्र सांधे व पाठदुखी, रुग्णास हालचाल करणे अशक्य होणे, क्वचीत प्रसंगी रुग्णास ताप येऊन रुग्णाच्या नाका-तोंडाद्वारे रक्त येणे,

चिकुनगुन्या – या आजाराचा प्रसार एडिस इजिप्ताय नावाच्या डासामार्फत होतो. या डासाची उत्पती स्वच्छ व साठवलेल्या पाण्यात होते.

लक्षणे – ताप येणे, डोके दुखणे, उलट्या व मळमळ होणे, अंगावर पुरळ येणे, सांधे दुखी हे प्रमुख लक्षणे आहे. हा आजार सर्व वयोगटात आढळून येतो. सदरील रोगावरील तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात, सामान्य रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.

जपानिज इन्सेफालायटिज मेंदूज्वर जे.ई – या रोगाचा प्रसार क्युलेक्स विष्णोई या डासाच्या मादीपासून होतो. या डासाची उत्पती भात शेती पाण्यात व स्वच्छ पाण्याच्या डबक्यात होते. विशेषत: 15 वर्षाखालील मुलामध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आढळून येते.

हत्तीरोग – हत्तीरोगाचा प्रसार क्युलेक्स क्युकीफेशीएटस नावाच्या डासांच्या मादीपासून होतो. हे डास घाण पाण्यावर अंडी घालतात. हत्तीरोग हा लवकर न कळणारा आजार असल्यामुळे सर्वांचे या रोगाकडे दुर्लक्ष होते.

लक्षणे – रुग्णास पायावर तसेच अंडाशयावर सूज येते  त्यामुळे शरीराला विद्रुपता येते.

उपचार – वरील सर्व रोगाची तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत.

वरील सर्व आजाराचे प्रमुख कारण हे आपल्या घराभोवतालची अस्वच्छता होय. त्यासाठी साधे व सोपे उपाय केल्यास भयंकर आजारापासून आपला बचाव निश्चित होऊ शकतो. त्यासाठी खालील उपाय योजना राबविणे गरजेचे आहे. आपल्या घराभोवताली पाणी साचू देऊ नका,  घरातील सर्व साठवलेले पाणी आठवड्यातून एकदा रिकामे करा. या साठ्यातील आतील बाजू व तळ घासून पुसून कोरड्या करुन पुन्हा वापराव्यात व पाण्याचे साठे घट्ट झाकनाने झाकून ठेवावेत,  अंगण व परिसरातील खड्डे बुजवावेत. त्यात पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी,  झोपताना पूर्ण अंगभर कपडे घालावे, पांघरुन घेवून झोपावे,  संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान दारे खिडक्या बंद कराव्यात,  खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात,  झोपताना भारीत मच्छरदाणीचा वापर करावा,  घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादी यांची वेळीच विल्हेवाट लावावी, संडासच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी असावा,  दर आठवड्याला नाल्यामध्ये रॉकेल किंवा टाकऊ ऑईल टाकावे.

या सर्व बाबी प्रत्येकाने घरी केल्यास डासाची उत्पती होणार नाही व डास चावणार नाही म्हणजेच योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवेल.  त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसर स्वच्छ ठेऊन किटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यास मदत होईल असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी केले.