आष्टा येथे शाफ्ट आधारीत पाणीपुरवठा यंत्रणेचे लोकार्पण

आष्टा येथे शाफ्ट आधारीत पाणीपुरवठा यंत्रणेचे लोकार्पण

 

चंद्रपूर, दि. 7: ग्रामपंचायत आष्टा येथे शाफ्ट आधारीत पाणीपुरवठा यंत्रणेचा लोकार्पण सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते पार पडला. शाफ्ट टेक्नॉलॉजी जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असून या टेक्नॉलॉजीमुळे शासनाच्या निधीची बचत झाली आहे. अजून काही ग्रामपंचायतीमध्ये अभ्यास करून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे श्री. जॉन्सन यांनी सांगितले. त्यासोबतच आष्टा ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायत करण्यासाठी सरपंच, सदस्य व उपस्थित नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

कार्यक्रमाला आयआयटी मुंबईचे डॉ. सतीश अग्निहोत्री, डॉ. प्रदीप काळबर, कोल इंडिया लिमिटेडचे अजय वर्मा, पंचायत समिती भद्रावतीचे गटविकास अधिकारी डॉ.मंगेश आरेवार, ग्रामीण पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, उपअभियंता ओकेंश दराडे, अजीवम वाटर लिमि. मुंबईचे डॉ. अनुजकुमार घोरपडे, अमोल बल्लाळ, अविनाश घोडगे, गोपाल महाजन, आष्टा ग्रामपंचायतीचे सरपंच चांगदेव रोडे, ग्रामसेवक भरत राठोड, विस्तार अधिकारी मनोहर कापकर यांच्यासह पंचायत समिती भद्रावती व आष्टा येथील नागरिकांची उपस्थिती होती.

 

शाफ्ट टेक्नॉलॉजी विषयी आयआयटी मुंबई येथील प्रोफेसर डॉ. प्रदीप काळबर यांनी सविस्तर माहिती देत या टेक्नॉलॉजीच्या कार्यप्रणाली विषयी सांगितले.

 

गावातील उंचावरील भागात 50 ते 60 कुटुंबांना यापूर्वी कमी दाब असल्याने नळाचे पाणी पोहोचत नव्हते. परंतु, शाफ्ट टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे गावातील उंचावरील भागातसुद्धा पाणी पोहोचण्यास अडचण येत नसल्याचे महिलांनी सांगितले. घरोघरी नळाद्वारे पाणी येत असल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद व हास्य फुलले. गेल्या 10-12 वर्षात पाणी भरण्याकरीता भरपूर वेळ द्यावा लागत असे. 5 ते 6 फूट खोल खड्डे करून सुद्धा नळाला पाणी येत नव्हते. तसेच मोटारपंप लावूनसुद्धा पाणी येत नसल्याचे महिलांनी सांगितले. परंतु, आता या पाण्याच्या खांबामुळे पाणी वेळेवर व प्रेशरने येत असून अर्ध्या तासात सर्व पाणी भरणे होत आहे व वेळेची बचत होत असून समाधानी असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.

 

या शाफ्ट टेक्नॉलॉजीला कोल इंडिया लिमिटेड, जिल्हा परिषद चंद्रपूर व ग्रामपंचायत आष्टामार्फत 10 टक्के निधीमधून रु. 6 लक्ष 52 हजार 647 एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. पाण्याचा खांब उभारण्यात आजीवन वाटर प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे यांनी मोलाचे कार्य केले असून आयआयटी मुंबईमार्फत नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आभार विस्तार अधिकारी (पंचायत) मनोहर कापकर यांनी मानले.