कृषी विभागाची बोगस खते बि- बियाणे विक्रेत्यांवर करडी नजर- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

तालुका निहाय भरारी पथकाची स्थापना

कृषी विभागाची बोगस खते बि- बियाणे विक्रेत्यांवर करडी नजर- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

 

भंडारा, दि. 21 : येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बि-बियाणे मिळण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न असून बोगस खते, बि-बियाणे विक्रेत्यांवर विभागाची करडी नजर असून असे प्रकार आढळल्यास सबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश कृषी विभागाने दिले आहे.

 

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कालच व्ही.डी.ओ. कान्फरन्सींग (व्ही.सी.) व्दारे जिल्हयातील सर्व कृषि उपसंचालक, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परीषद, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मोहीम अधिकारी, जिल्हा परीषद, उविकृअ कार्यालयाचे तंत्र अधिकारी, कृषि अधिकारी, पंचायत समिती, ताकृअ कार्यालयातील कृषि अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.

 

यावेळी भरारी पथकामार्फत खते, बियाणे व किटकनाशके विक्रेत्यांची कसून तपासणी करण्यात येवून विना परवाना विक्री, बियाणे, खते व किटकनाशके यांची जादा दराने विक्री, भेसळयुक्त खते, कृषि निविष्ठांची लिंकींग या बाबत शोध मोहीम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काही बोगस कंपन्यांचे खाजगी एजन्ट गावागावात शेतकऱ्यांचे घरी जावून बियाणे खते व किटकनाशके स्वस्तात मिळवून देतो असे आमिष देतात, शेतकऱ्यांना बिले देत नाहीत, अशावेळी शेतकऱ्याची फसवणूक होते याबाबतही गुप्त माहीती काढण्यात येवून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यावेळी महसुल व पोलीस विभागाची मदत घेण्यात येणार आहे. तसेच तालुका भरारी पथकाने केलेल्या विक्रेत्यांचे तपासणीनंतर त्या दुकानांची फेरतपासणी करण्यात येणार आहे .

 

खरीप हंगाम 2023 मध्ये खते, बियाणे व किटकनाशके या कृषि निविष्ठांची जादा दराने विक्री, भेसळयुक्त खते, कृषि निविष्ठांची लिंकींग करून शेतकऱ्याची होणारी फसवणूक या बाबींना आळा घालणेसाठी बियाणे, खते व किटकनाशके यांचा काळाबाजार होणेस प्रतिबंध होणेसाठी व गुणवत्ता पुर्ण बियाणे, खते व किटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध होणेसाठी जिल्हास्तरावर 1 व प्रत्येक तालुक्यात 1 याप्रमाणे एकुण 8 भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून खत, बियाणे व किटकनाशके विक्रेत्यांचे, गोडावूनची कसून तपासणी करण्यात येणार आहे. बियाणे, किटकनाशके व खतांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड स्विकारली जाणार नाही, यासाठी जिल्हयात कुणीही अनधिकृत अथवा विनापरवाना असलेले बियाणे, खते व किटकनाशके विक्रीस आणू नये अन्यथा संबधित विक्रेते, कंपनी अथवा असे कृत्य करणाऱ्या कोणत्याही खाजगी एजंट विरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. अशी माहीती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संगिता माने यांनी दिली आहे.

 

मान्सूनचा पाऊस लांबल्याने लागवड /पेरणीला विलंब होत असून 1 जुलै पर्यंत 100 मि.ली.मीटर पाऊस झाल्या शिवाय बियाणेची लागवड / पऱ्हे टाकू नये, खताचे महीना निहाय आवंटन प्राप्त होत असते, त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस पडल्यांनतर एकाच वेळी दुकांनावर गर्दी न करता पेरणी करिता लागणारे बियाणे व खते आताच खरेदी करावे, त्यामुळे महीन्यात झालेल्या विक्रीच्या प्रमाणात खते उपलब्ध करून देता येतील व केवळ युरीया खताचा वापर न करता बेसल डोज साठी संयुक्त खते यांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन कृषि संचालक (निवगुनि) विकास पाटील यांनी केले आहे.