पुर परिस्थिती उपाययोजनेसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामार्फत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांवर पुर परिस्थिती निर्माण होत असते. त्याअनुषंगाने पावसाळा सुरु होण्यापुर्वी पुर परिस्थितीबाबत उपाययोजना करण्यासाठी तसेच मान्सुन काळात आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत जिल्ह्यातील शोध व बचाव पथकाचे क्षमता बांधणी व पुर बचाव प्रात्यक्षिक संदर्भाने यावर्षी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल ( NDRF) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०६ जुन ते १५ जुन २०२३ रोजी पर्यंत प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहे. यासंदर्भाने पोलीस दलासाठी दिनांक ०६/०६/२०२३ व दिनांक ०७/०६/२०२३ असे दोन दिवसीय सकाळी १०.०० ते १८.०० वाजेपर्यंत कार्यशाळेचे आयोजन, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे करण्यात आले आहे. यासोबतच कोटगल बॅरेज गडचिरोली येथे आपत्ती निवारण प्रशिक्षण मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आलेले आहे.
याअनुषंगाने आज दिनांक ०६/०६/२०२३ रोजी झालेल्या कार्यशाळेत पुर परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांसोबत पोलीस विभागाने कशापद्धतीने मदत करावी, काय करणे अपेक्षित आहे ? याबाबत कार्यशाळेत सांगण्यात आले. तसेच कोटगल बॅरेज गडचिरोली येथे आपत्ती निवारण प्रशिक्षण मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रात्यक्षिकाद्वारे पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तसेच बोटी, लाईफ सेव्हिंग जॅकेट व पीसीआर इत्यादी पद्धतीचा अवलंब करुन प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या कार्यशाळेत गडचिरोली पोलीस दलाचे एकुण ६० पोलीस अंमलदार व मोटार परिवहन विभाग गडचिरोली येथील ०१ पथक हजर होते.
सदरच्या कार्यशाळेत मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. प्रभारी जिल्हाधिकारी श्री. धनाजी पाटील सा., मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली श्री. कुमार आशिर्वाद सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. समाधान शेंडगे सा., मा. जिल्हा सल्लागार ( आपदा मित्र) श्री. कृष्णा रेड्डी सा. मा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. निलेश तेलतुंबडे सा. व श्री. प्रदिप, इन्स्पेक्टर ( NDRF) हे उपस्थित होते.