जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नगर पालिका प्रशासन विभागाचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला नगर पालिका प्रशासन विभागाचा आढावा

 

भंडारा, दि. 30 मे, : शहरी भागात नगर परिषद व नगर पंचायतीच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. नगर परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व कामकाजाचा आढावा आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घेतला. दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत युडी आयडी कार्डची माहिती तयार ठेवावी. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या बैठका वॉर्डनुसार घेण्यात याव्यात. रेतीसाठा उपलब्ध असल्याने पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम पूर्ण होईल. त्याअनुषंगाने नियोजन करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी दिल्या.

 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद कक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सर्व शासकीय कार्यालयाचे फायर ऑडीट करा, त्यासोबतच मॉक ड्रिल व प्रशिक्षणाचे आयोजन सुध्दा करण्यात यावे. पीएम स्वनिधी अंतर्गत डिजिटल व्यवहाराला चालना देण्यात यावी. पावसाळ्यापूर्वी अतिक्रमणासंबंधी मोहीम राबविण्यात यावी. बॅनरवर क्यूआर कोड बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने प्रिंटर्सची संयुक्त बैठक घेण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी दिले.

 

नगर परिषद व नगर पंचायत माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या नगरोत्थान महाभियान योजना, नागरी दलित वस्ती सुधारणा योजना, वैशिष्टपूर्ण योजना, घन कचरा व्यवस्थापन, मालमत्ता कर वसुली, अमृत योजना इत्यादी योजनांचा सविस्तर आढावा यावेळी घेतला.