शबरी आदिवासी महामंडळातर्फे दहा लक्ष पर्यंत कर्ज

शबरी आदिवासी महामंडळातर्फे दहा लक्ष पर्यंत कर्ज

Ø ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत लाभ घेण्याचे आवाहन

 

चंद्रपूर, दि. 18: शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या 18 ते 45 वयोगटातील स्त्री-पुरुष तसेच बचत गटासाठी रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने अल्प व्याजदरावर दीर्घ मुदतीच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शबरी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन शाखा व्यवस्थापक आर. एस. भदाणे यांनी केले आहे

 

महिला सबळीकरण योजनेसाठी 2 लक्ष रुपये, स्वयंसहायता बचत गटासाठी 5 लक्ष, कृषी आणि संलग्न व्यवसायासाठी दोन लक्ष, हॉटेल/ढाबा व्यवसायासाठी 5 लक्ष, स्पेअर पार्ट/ऑटो वर्कशॉप/गॅरेज व्यवसायासाठी 5 लक्ष, लघुउद्योग व्यवसायासाठी 3 लक्ष, तर वाहन व्यवसायासाठी 10 लक्ष रुपये कर्ज महामंडळातर्फे देण्यात येत आहे.

कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्ज मागणी अर्जासोबत आधार कार्ड, जातीचा दाखला व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. कर्जयोजनेविषी अधिक माहितीसाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, मुल रोड, मधुबन प्लाझा, तिसरा माळा, माउंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल शेजारी, शिवाजीनगर, चंद्रपूर येथील शाखा कार्यालयात भेटावे.