क्रीडा शिक्षकांच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीराला सुरुवात

गडचिरोलीतील युवकांमध्ये प्रतिभेचे भंडार – सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी

क्रीडा शिक्षकांच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीराला सुरुवात

गडचिरोली, दि.05:गडचिरोली जिल्ह्यातील युवकांमध्ये क्रीडा विषयक प्रतिभांचे भंडार असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी क्रीडा शिक्षकांच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनावेळी केले. आठ दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. निसर्गतःच प्रचंड क्षमता असलेले प्रतिभावान खेळाडू गडचिरोली जिल्ह्यात असून त्यांना योग्य मार्गदर्शन व योग्य संधी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा प्रशिक्षक म्हणून प्रत्येक गावात गावस्तरीय क्रीडा शाळाही सुरू करणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले. गावागावात असलेल्या मैदानात स्थानिक युवकांना मोफत मार्गदर्शनाबरोबरच आधुनिक क्रीडा क्षेत्र याबद्दलची माहिती दिली तर निश्चितच ते भविष्यात देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे स्वप्न पाहतील. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, प्रमुख अतिथी भास्कर घटाळे तालुका क्रीडा अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते प्रणय खैरे उपस्थित होते. आठ दिवसांच्या प्रशिक्षणा साठी नुकतेच बालेवाडी पुणे क्रीडा संकुल येथून प्रशिक्षण घेऊन आलेले दहा प्रशिक्षकांसह गडचिरोली जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

खेळात आरोग्य आहे, खेळात शिक्षण आहे, खेळात मैत्री आहे, खेळात जीवन आहे, त्याचबरोबर खेळातून जग जवळ करण्याची ताकदही आहे. गावागावातील शाळांमधून क्रीडा विषयक मार्गदर्शन मुलांना त्या त्या वयातच दिले तर त्यांची शरीरयष्टी त्या खेळासाठी निश्चित वेळेत तयार होईल. यातूनच त्या खेळाविषयी त्यांच्यात आवड निर्माण होऊन ते जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटवतील असे सचिन अडसूळ यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. बदलत्या क्रीडा क्षेत्रातील धोरणानुसार आता वेगवेगळ्या स्तरावर सामन्यांचे आयोजन करून त्यातून आर्थिक फायदाही खेळाडूंना होत आहे. ‘खेलोगे कुदोगे तो लाजवाब बनोगे’ या म्हणी प्रमाणेच क्रीडा क्षेत्रातील तरुणांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदललेला आहे. क्रीडा क्षेत्राला व्यावसायिकतेची जोडही आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिभांचे भंडार असलेल्या युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्याचे कार्य सर्व शिक्षकांनी मिळून केले पाहिजे असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी उपस्थित शिक्षकांना प्रशिक्षित शिक्षकांकडून मार्गदर्शन आत्मसात करण्याचे आवाहन केले. गडचिरोली जिल्ह्यातील फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, धनुर्विद्या याचबरोबर अनेक वैयक्तिक क्रीडा प्रकारात प्राविण्य असलेले खेळाडूंना पुढे घेऊन जाण्यासाठी क्रीडा विभाग प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर घटाळे यांनी केले तर सूत्रसंचालन खुशाल मस्के तालुका क्रीडा संयोजक यांनी केले तर आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध बडकेलवार राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी मानले.

गडचिरोली जिल्ह्यातून पुणे येथे प्रशिक्षित झालेले मास्टर ट्रेनर सुरेश निंबाते, खुशाल मस्के, भूपेंद्र चौधरी, मनीष बानवले, अनिल बारसागडे, अतुल येलमुले, संदीप हिचामी, मिलिंद साळवे, संतोष गईनवार, मृणाली सराफ, पुरुषोत्तम बोरीकर व प्रमोद भांडारकर यांचा समावेश होता.