जिल्हा विकास आराखडयासाठी नागरिकांकडून सूचना आमंत्रित

जिल्हा विकास आराखडयासाठी नागरिकांकडून सूचना आमंत्रित

 नियोजन कार्यालयास लेखी सूचना पाठवाव्यात

भंडारा, दि. 4 : राज्याची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 1 ट्रिलीयन डॉलर 2037 पर्यंत 2.5 ट्रिलीयन डॉलर व सन 2047 पर्यंत 3.5 ट्रिलीयन डॉलर इतकी पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय असुन राज्याच्या सकल उत्पन्नामध्ये 15% वरुन 20% पर्यंत राज्याचे योगदान असावे, ही बाब विचारात घेऊन जिल्हयाचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.

या अनुषंगाने आजपर्यत जिल्हा नियोजन समितीच्यावतीने चार बैठका घेण्यात आल्या आहेत. तरी नागरिकांनी देखील जिल्हयाच्या विकास आराखडयासाठी सूचना नियोजन कार्यालयात dpobhandara@gmail.com या ई-मेलवर लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.

जिल्हा विकास आराखडयाबाबत निती आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा हा विकास घटक म्हणून घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हयाचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये आतापर्यत नगरविकास, माहिती कार्यालय, आरोग्य, उदयोग या विभागांच्या प्रमुख भागधारकांसोबत सल्लामसलत करण्याकरीता कार्यशाळा देखील घेण्यात आल्यात. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, जिल्हा नियोजन अधिकारी शशीकुमार बोरकर, कौशल्य विकास विभागाचे सुधाकर झळके, तसेच रेशीम कार्यालयाचे श्री. ढोले यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या कार्यशाळांचे प्रास्ताविक करतांना आराखडा तयार करतांना प्रत्येक क्षेत्रात असलेली जिल्हयाची सद्यस्थिती, जिल्हयाचे व्हिजन व प्रमुख भागधारकांसोबत सल्लामसलत करुन आवश्यक ती माहिती समाविष्ट करावयाची आहे. तदनंतर क्षेत्र व उपक्षेत्राची निवड करुन जिल्हा कृती आराखडा तयार करावयाचे असुन उपस्थित भागधारकांनी विभागाची माहिती तपासुन त्यामध्ये काही सुधारणा, काही नवीन बाबी समाविष्ट करणे इ. बाबत अभिप्राय देण्याची विनंती केली.

या कार्यशाळेत प्रामुख्याने कौशल्य विकास, तंत्र शिक्षण, उद्योग, रेशीम उद्योग, खादी व ग्रामउद्योग इ. क्षेत्रावर चर्चा अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमुद केले. आज विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या सूचनेनुसार विभागीय उपायुक्त (नियोजन) धनजंय सुटे यांनी देखील जिल्हा विकास आराखडयाच्या निमीत्ताने सर्व विभागांच्या कार्यालयप्रमुखांना मार्गदर्शन केले.