विशेष लेख – रेशीम शेती, फायद्याची शेती…

विशेष लेख – रेशीम शेती, फायद्याची शेती…

 

पारंपरिक शेतीच्या तुलनेत रेशीम शेती उद्योग हा उत्पादन देणारा आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी परिसरात टसर आणि तुतीच्या रेशीम कापड आणि धाग्याची निर्मिती होते. टसर रेशीमच्या ‘करवती साडी’ चा इतिहास सुमारे 400 वर्षे जुना आहे. आंधळगाव येथील करवती साडी प्रसिध्द आहे.

 

जिल्हा रेशीम कार्यालय, भंडारा अंतर्गत रेशीम मुलभूत सुविधा केंद्र, जमनी, टसर रेशीम केंद्र, निष्टी ता. पवनी व टसर रेशीम फार्म देवरी ता. लाखनी येथे काम चालते. प्रामुख्याने पवनी, लाखनी व भंडारा तालुक्यात कीटक-संगोपन व मोहाडी तालुक्यात टसर कापड निर्मिती कामकाज केले जाते. या व्यतिरीक्त केंद्रीय रेशीम मंडळाचे बुनियादी बीज प्रगुणन एवं प्रशिक्षण केंद्र, दवडीपार व क्षेत्रीय रेशीम अनुसंधान केंद्र, आंबाडी ही देखील दोन कार्यालय कार्यरत आहेत. या कार्यालयामार्फत तुती रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण देणे, तुती बेणे उपलब्ध करून देणे, तुती रेशीम किटक संगोपन मार्गदर्शन करणे, कोष विक्रीसाठी मार्गदर्शन करणे याबाबत कामकाज केले जाते.

 

नुकतीच डिसेंबर 2022 मध्ये सचिव, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग विरेंद्र सिंग, संचालक रेशीम संचालनालय प्रदिपचंद्रन व रेशीम संचालनालय उपसचांलक महेंद्र ढवळे यांनी नुकतीच जिल्ह्यातील रेशीम मुलभूत सुविधा केंद्र, जमनी व मोहाडी येथील भंडारा सिल्क उद्योग, प्रा. ‍लि. मोहाडीच्या केंद्रास भेट दिली.

 

जमनी येथे सुरू असलेले रेशीम प्रर्दशनी, तूती व टसर खाद्यवृक्षाचे फार्म, टसर अंडीपुंज निर्मिती, टसर कोषापासून धागाकरण कामकाजाची माहिती रेशीम विकास अधिकारी ए. एम. ढोले यांनी सचिव व संचालक यांना माहिती दिली. जिल्ह्यातील महिला बचतगटांना प्रशिक्षण व अल्पदरात एमआरटीएम मशीन उपलब्ध करून रिलींग क्षेत्राचा विकास करावा, जेणेकरून पुढील साखळी विकसीत होऊन राज्यात तयार झालेल्या कोषांचा पुर्णत: राज्यातच वापर होऊन मुल्यवृधी होईल तसेच गावागावात समुह पध्दतीने तुती लागवड करून रेशीम उद्योग करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे, सचिव विरेंद्र सिंग यांनी सुचविले होते.

 

त्यानंतर मोहाडी येथील भंडारा सिल्क उद्योग, प्रा ‍लि. मोहाडी येथील ॲटोमॅटीक रिलींग केंद्रावर सुरू असलेल्या तुती धागाकरण व टसर कापड निर्मीतीची पाहणी केली होती. टसर रेशीममध्ये सन 2022-2023 जानेवारी ते डिसेंबरपर्यत 251 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. शेतकरी व विभागीयस्तरावर अंडीपुंज पुरवठा 69 हजार किलोग्राम तर 4लाख 51 हजार 445 किलो कोष उत्पादन झाले. विभागीय धागा उत्पादनातही जिल्ह्याने प्रगती केली. तर तुती रेशीममध्ये 963 किलोग्राम उत्पादन जुलै 2022 पर्यत झाले.

 

नाविण्यपूर्ण योजनेतून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी रेशीम उदयोगासाठी काही नवीन प्रयोग केले.टसर रेशीम कोष उत्पादक ग्राम निष्टी येथे टसर मुलभूत सुविधा केंद्राचे बांधकाम, रिलींग मशीन, कोष ड्रायर मशीन व लाभार्थीना किटक संगोपन साहित्य पुरवठा करणे या कामाकरीता 64 लाख रूपये निधीची मान्यता दिली आहे.

 

उच्च दर्जाच्या वस्त्रांमध्ये रेशीम वस्त्रांचा समावेश होतो. कथा – पुराणांमध्येही रेशमी वस्त्रांचा उल्लेख आहे. काही हजार वर्षांपासून भारतात रेशमी वस्त्रांचा वापर होतो. इसवी सनाच्या आधी चीनमध्ये रेशमाचा वापर सुरू झाला, असा उल्लेख आहे. नंतर तो भारतात आला. भारतातील रेशीम उद्योगात महाराष्ट्राचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यातही विदर्भाचा वाटा मोठा आहे. एवढेच नाही विदर्भातील ‘टसर रेशीम’ने रेशीमच्या बाजारात स्थान निर्माण केले आहे. यात रेशीम संचालनालय नागपूरचा वाटा महत्त्वाचा आहे. या रेशीम संचालनालयाची स्थापना 1 सप्टेंबर 1997 रोजी झाली होती. वर्ष 2022 संचालनालयासाठी रोप्य महोत्सवी वर्ष होते. खऱ्या अर्थाने रेशीम व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय ठरत आहे.

 

रेशीम उत्पादनात जगात चीनचा प्रथम तर भारताचा दुसरा क्रमांक आहे. रेशीमच्या बाजारात महाराष्ट्राच्या टसर रेशीम पैठणीला मोठी मागणी आहे. विदर्भातील टसर रेशीम उद्योग प्रामुख्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या चार जिल्ह्यात होतो. ‘ऐन’ आणि ‘अर्जुन’ वृक्ष असलेल्या वन क्षेत्रात टसर रेशीमचे उत्पादन घेतात.

 

महाराष्ट्र राज्य ग्रामोद्योग महामंडळामार्फत पाचगणी येथे रेशीम संशोधन केंद्र सुरू झाल्यानंतर (1956) संशोधन करून सातारा व पुणे विभागातील जिल्हयांमध्ये तुतीची लागवण करून कोषांचे उत्पादन सुरू करण्यात आले. 1970 पासून शेतकरी व्यवसाय म्हणून रेशीम शेती करू लागलेत. रेशीम शेती हा शेतीला पूरक जोडधंदा होऊ शकतो हे लक्षात आल्याने, रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 1 सप्टेंबर 1997 रोजी रेशीम संचालनालय स्थापन करण्यात आले. संचालनालयाचे पहिले स्वतंत्र कार्यालय – जिल्हा रेशीम कार्यालय, नागपूर येथील कार्यालयात सुरू करण्यात आले.

 

महाराष्ट्रात रेशीम उत्पादनाचे प्रयोग

 

महाराष्ट्रात रेशीम उत्पादनाची सुरुवात 1956 मध्ये खादी ग्रामोद्योगाने पाचगणी केंद्रावर केली. 1970 मध्ये व्यावसायिक पातळीवर रेशमाची शेती सुरू झाली. जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई आणि विदर्भ विकास महामंडळामार्फत ‘रेशीम शेती उद्योग योजना’ राबविली जात होती. यात विदर्भ विकास महामंडळ ‘टसर रेशीम उद्योग योजना’ राबवत होते. टसरच्या कोषाच्या धाग्यावर प्रक्रिया करून आंधळगाव व मोहाडी परिसरात कर्वती साड्या विणल्या जात होत्या.

 

1 सप्टेंबर 2007 पासून, 1 सप्टेंबर हा दिवस (रेशीम संचालनालयाचा स्थापना दिवस) ‘रेशीम दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

 

तुतीला ‘कृषी पिका’ची मान्यता

 

तुती रेशीम पिकाला 11 जानेवारी 2021 रोजी ‘कृषी पीक’ म्हणून मान्यता मिळाली आहे. तुतीच्या झाडाला ‘तुती वृक्षा’चा दर्जा मिळाल्यामुळे अनेक योजनात तुती पिकाला कृषी पिकांप्रमाणे लाभ मिळेल. याचा तुती उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळेल. रेशीम हा शेतीपूरक व्यवसाय ठरू शकतो. याच दृष्टीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी तुती रेशीम उद्योग कार्यशाळेचे आयोजन केले. त्यात दोनशे वरून अधिक शेतक-यांनी सहभाग घेतला होता. माजी संचालक रेशीम संचालनालय डॉ. एल. बी. कलंत्री यांनी यावेळी शेतकऱ्यांना फायद्याची रेशीम शेती यावविषयी सखोल मार्गदर्शन केले होते. जिल्हा रेशीम कार्यालयाचे रेशीम विकास अधिकारी श्री. ढोले व त्यांचे सहकारी रेशीम शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात.