जात वैधता प्रमाणपत्र वाटप व मार्गदर्शन शिबीर संपन्न

जात वैधता प्रमाणपत्र वाटप व मार्गदर्शन शिबीर संपन्न

 

भंडारा, दि.  : ‘सामाजिक न्याय पर्व- २०२३’ अंतर्गत नगर परिषद गांधी कनिष्ठ महाविद्यालय, भंडारा येथे जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन शिबीर व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय भंडारा मार्फत १ एप्रिल ते १ मे २०२३ या महिनाभराच्या कालावधीत विविध कार्यक्रम व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी ‘सामाजिक न्याय पर्व’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींना भेटी देऊन योजनांची जनजागृती करणे, १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ दरम्यान मागसवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देणे, महाविद्यालय, आश्रमशाळा, निवासी शाळा व शासकीय वस्तीगृहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

याचाच एक भाग म्हणून दि. ६ एप्रिल २०२३ ला नगर परिषद गांधी कनिष्ठ महाविद्यालय, भंडारा येथे जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन व प्रमाणपत्र वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आले. त्या प्रसंगी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती भंडाराचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. मंगेश वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी नगर परिषद कनिष्ठ महाविद्यालय भंडाराचे मुख्याध्यापक ओ. एन. नागोसे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे व्यवस्थापक अमित रामटेके, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच जात पडताळणी समिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.