राष्ट्रउभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तरुणांना संधी : संतोष नन्नावार

राष्ट्रउभारणीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तरुणांना संधी : संतोष नन्नावार

नागभीड:04/02/2023
विद्यार्थी युवकांचे व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकसित करण्याच्या प्राथमिक उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात करण्यात आली. माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी हे या योजनेचे बोधवाक्य आहे. ते आपणाला लोकशाही, सामाजिक बांधिलकीची जाणीव करुन देते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वत:चे व्यक्तिमत्व विकसित करण्याबरोबरच समाजासाठी खूप मोलाचे योगदान देता येते. सामाजिक कार्यासाठी आणि प्रगतीसाठीच नाही तर राष्ट्र उभारणीत रासेयो शिबिराच्या माध्यमातून संधी दिली जाते, असे प्रतिपादन संतोष नन्नावार यांनी केले.
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ तळोधी (बा) द्वारा संचालित यादवराव पोशट्टीवार कला महाविद्यालय तळोधी(बा)तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन जि.प.उच्च प्राथ शाळा आकापूर येथे करण्यात आले. यानिमित्त ‘युवकांची समाज निर्मितीत भुमिका’ या विषयावर आयोजित उद्बोधन वर्गात नन्नावार बोलत होते. अध्यक्षस्थानी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अनिल थेरकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून या.पो.महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शशिकांत शेंडे, लोकविद्यालयाचे पदवीधर शिक्षक संतोष नन्नावार उपस्थित होते.
युवा म्हणजे एक आनंद, एक उत्साह, एक हिंमत. आज आपल्या देशात युवा पिढी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतांना दिसतोय.आपल्या भारत देशामध्ये ६५ टक्के युवक आहेत आणि हेच युवक उद्याचे भविष्य आहे. आपल्याला गौरवशाली भारत घडविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. गणित, विज्ञान, भाषा या विषयाखेरीज आपल्याला चारित्र्य या विषयाकडे लक्ष देण हे फार महत्वाच झाले आहे. आज समाजाला अलौकिक,उज्वल, चारित्र्यवान युवापिढीची गरज असल्याचे नन्नावार म्हणाले. यावेळी डॉ. शशिकांत शेंडे यांनी ‘आजचा युवक व करिअर ‘या विषयावर मार्गदर्शन केले. आजच्या नवयुवकांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना स्वत:चा कल, स्वत:वर असलेला आत्मविश्वास , स्वावलंबीपणा सकारात्मकतेने विचार पूर्वक आपले शिक्षण, आपली नोकरी व आपले क्षेत्र निवडले पाहिजे तरच त्या दिशेने अधिक प्रगती होते. यावेळी गावातील पालक , प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.