मतदार ओळखपत्र नाही…….पर्यायी कागदपत्रे ग्राह्य : निवडणुक आयोग

मतदार ओळखपत्र नाही…….पर्यायी कागदपत्रे ग्राह्य : निवडणुक आयोग

 

भंडारा दि. 18: आगामी विधानपरिषदेची द्विवार्षिक पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त पर्यायी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत आयोगाने आदेश दिले आहेत.

 

पर्यायी कागदपत्रात आधार कार्ड, वाहन चालक परवाना,पॅन कार्ड,भारतीय पारपत्र, केंद्र / राज्य सरकार / सार्वजनिक उपक्रम / पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले फोटोसह सेवा ओळखपत्र,खासदारांना / आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र,संबंधित शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार ज्या शैक्षणिक संस्थेत काम/नोकरी करीत आहेत त्या शैक्षणिक संस्थांनी जारी केलेले सेवा ओळखपत्र विद्यापिठाद्वारा वितरीत मुळ पदवी/पदविका प्रमाणपत्र,सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले शारीरिक दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र (UDID) चा समावेश आहे.

 

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात. तसेच, छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे / पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. मतदार ओळखपत्र व पर्यायी ओळखपत्र याबाबत काही संभ्रम असल्यास भारत निवडणुक आयोगाचे दि. 11.1.2023 रोजीचे मुळ आदेश अंतिम राहतील. भारत निवडणूक आयोगाचे सदर आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व संबंधित अधिकारी व सर्व मतदान केंद्राध्यक्ष यांच्या निदर्शनास आणून द्यावेत असे निर्देश निवडणुक आयोगाने दिले आहेत.