महिला बचतगटांना उद्योजक गट करणे काळाची गरज – मुख्य कार्यकारी अधिकारी

महिला बचतगटांना उद्योजक गट करणे काळाची गरज – मुख्य कार्यकारी अधिकारी

 

भंडारा दि 10: महिला बचत गट सबलीकरणासोबत महिलांच्या व्यवसाय व वृध्दीकरिता बचत गटांना उद्योजक गट करणे काळाची गरज आहे. बचत गटातील महिलांना जास्त उत्पन्न मिळावे यासाठी त्यांना उद्योग कसे करावे याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी आज दिले.

 

जिल्हा परिषदेच्या सभा कक्षात आयोजीत नवतेजस्विनी महाराष्ट्र महिला व उद्योग विकास प्रकल्पा अंतर्गत जिल्हा स्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत श्री. कुर्तकोटी बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसुंगे, माविमचे प्रदिप काठोळे आदी उपस्थित होते.

 

भंडारा जिल्ह्यामध्ये उपजिवीका विकास घटकाअंतर्गत महिला शेती पुरक व्यवसाय सोबतच दुध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. जिल्ह्यातील महिलांमध्ये उद्योगाबाबत तसेच उद्योजक होण्याबाबत प्रचंड उत्साह आहे. काही ठिकाणी महिलांनी नवीन उद्योग सुरू करून त्याची ब्रँडींग व मार्केटिंग केली आहे. याच धरतीवर जिल्ह्यातील उद्योजक होऊ इच्छीणाऱ्या महिलांना भांडवल उपलब्ध करून दिल्यास त्याही मोठ्या प्रमाणात यश संपादीत करू शकतात. तेव्हा त्यांना सर्वतोपरी मदत करण्याच्या मानसिकतेतून सर्व विभागांनी प्रयत्न करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले.