शालेय विद्यार्थ्यांचा उमा नदी संवाद यात्रा अभियानात सहभाग

शालेय विद्यार्थ्यांचा उमा नदी संवाद यात्रा अभियानात सहभाग

Ø ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम

 

चंद्रपूर, दि. 9 : नद्यांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने ‘चला जाणुया नदीला’ हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत चिमुर येथील नेहरू विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयाने सोनेगाव बेगड़े या प्रभागात राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे आयोजन करून उमा नदी संवाद यात्रा उपक्रमात सहभाग नोंदविला.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन चला जाणुया नदी अभियानाचे नोडल अधिकारी तसेच जलसंधारण अधिकारी पवन देशट्टीवार यांनी केले. अध्यक्षस्थानी नेहरू विद्यालयाचे प्राचार्य विलास वडस्कर उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात श्री. देशट्टीवार यांनी ‘चला जाणूया नदीला’ अभियानाबद्दल सविस्तर माहिती दिली. श्री. वडस्कर यांनी रासेयो शिबिराच्या आयोजनाची आवश्यकता व महत्व याबाबत मार्गदर्शन केले. प्रभु फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल गुळघाणे यांनी, नद्यांचे पुनरुज्जीवन काळाची गरज याबाबत मार्गदर्शन करून उमा नदी संवाद यात्रेबद्दल संवाद साधला.

 

तर चिमुर पंचायत समितीचे मनरेगा विभागाचे सहायक कार्यक्रम अधिकारी अजय काकडे यांनी नदी अमृत वाहिनी करण्यासाठी लोकसहभाग व श्रमदानाबाबत ग्रामस्थांना आवाहन केले. उमा नदी संवाद यात्रा माध्यमातून जनजागृती करण्यासंदर्भात सोनेगांव बेगड़े येथे यात्रा काढण्यात आली. यात्रेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिरार्थी तसेच जि.प.शाळेचे विद्यार्थी, भजन मंडल, महिला बचत गट आणि गावातील पाणी कारभारी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. यात्रा समाप्तीनंतर यात्रेमधे असलेल्या सर्वांनी नदी स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले. त्याचबरोबर नदी स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन आठवले समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे संवाद यात्रेचे महत्व पटवून दिले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वागधरे यांनी केले. संचालन भालचंद्र लोडे तर आभार प्रा. दांडेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी अंकुश बावणे तसेच रा.से.यो विद्यार्थी व गावातील ‘मी पाणी कारभारी’ टीमच्या सदस्यांनी सहकार्य केले.