9 जानेवारी पासून भंडारा जिल्हा न्यायालयात ई फाइलिंग केंद्र कार्यान्वित

9 जानेवारी पासून भंडारा जिल्हा न्यायालयात ई फाइलिंग केंद्र कार्यान्वित

 

भंडारा दि 7: कोरोनाच्या आक्रमणामुळे वेळेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे कागदविरहित न्यायप्रक्रियेच्या माध्यमातून न्यायालयीन न्यायालयीन कामकाजाला गती देतानाचा पक्षकारांचा वेळ व खर्च वाचविण्याचे दृष्टीने माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्यामार्फत येत्या 9 जनवरी पासून संपूर्ण भारतातील सर्व न्यायालयांमध्ये ई- फाइलिंग केंद्र कार्यान्वित करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. पक्षकारांना होणारा त्रास, वेळेची बचत आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक सुकर करण्याच्या दृष्टीने माननीय सर्वोच्च न्यायालयाने सदर पाऊल उचलले आहे. या मोहिमेअंतर्गत भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयातदेखील दिनांक 09/01/2023 पासून ई- फाइलिंग केंद्र सुरू होत आहे.

 

सदर ई-फायलिंग केंद्रात वकिलांना तसेच स्वतःहून केस लढविणाऱ्या पक्षकारांना स्वतःची प्रकरणे ई- फाइलिंग प्रणालीच्या मदतीने केंद्रात येऊन अथवा त्यांच्या घर अथवा कार्यालयातून सुद्धा ई- फाइलिंग सेवेच्याhttp://filing.ecourts.gov.in या संकेत स्थळावरून दाखल करता येणार आहेत. त्या दृष्टीने जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती उपलब्ध केली आहे. त्यात केस दाखल करणे, केस सोबत आवश्यक कागदपत्रे दाखल करणे, ई-वायलेट किंवा ग्रास(GRAS) प्रणालीद्वारे कोट फी सुद्धा दाखल करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती माहिती जिल्हा व सत्र न्यायालयातील ई- सेवा केंद्र आणि संबंधित संगणक विभागामध्ये उपलब्ध करण्यात आली असून चार स्वतंत्र समर्पित दाखल केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

 

सदर ई -फायलिंगच्या दृष्टीने वकिलासाठी नोंदणी करणे हे आवश्यक असून त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्राची सूची ई-सेवा केंद्रात उपलब्ध केली आहे.

 

सदर योजनेचा लाभ सर्व वकील मंडळींनी तसेच पक्षकारांनी घेण्याचे आवाहन माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांनी केले आहे.