भंडारा | सावित्रीच्या लेकीकडून कृतज्ञतेचा सोहळा

सावित्रीच्या लेकीकडून कृतज्ञतेचा सोहळा

 

· माविम जिल्हा कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 

· खरबी येथील चौन्डेश्वरी महिला बचत गटाच्या अर्चना सिन्देपुरे, संगीता बांते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन

 

भंडारा, दि. 3 : स्त्री शिक्षणासाठी जिने दगड धोंडे सहन केले त्या सावित्री मायला आज तिच्या कर्तृत्वान लेकींनी अभिवादन केले. स्त्री शिक्षणाच्या पाया घालणाऱ्या आद्यशिक्षकेप्रति कृतज्ञतेचा भाव त्यांनी व्यक्त केला. प्रसंग होता मोहाडी येथील मावीमच्या कार्यालयातील सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा.

 

शासकीय कार्यक्रमात शक्यतो प्रशासकीय विभाग प्रमुखांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन नेहमी होते. मात्र माविमचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप काठोळे हे कायमच नवीन संकल्पना राबवतात. त्यामध्येच त्यांनी महिला बचत गटांच्या सदस्य ज्या त्यांच्या हिमतीने कुटुंबाचा डोलारा सांभाळत आर्थिकरित्या सक्षम झालेल्या आहेत, त्या दोन महिला बचत गटाच्या सदस्या अर्चना सिन्देपुरे व संगीता बांते यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन केले. महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडाराच्या वतीने महिला माविम प्रांगण मोहाडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. खरबी येथील चौन्डेश्वरी महिला बचत बचत गटातील महिला अर्चना सिन्देपुरे, संगीता बांते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

 

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, माविम, भंडाराचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे, लेखाधिकारी मुकुंद देशकर, भावना डोंगरे, मनोज केवट उपस्थित होते.

 

याप्रसंगी जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी मनोगत व्यक्त करतांना महिला आर्थिक विकास महामंडळ महिलांच्या विकासाची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांच्या प्रेरणेतून माविम जिल्ह्यात महिलांच्या आर्थिक विकासासाठी कार्य करीत आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, असे मत व्यक्त केले.

 

जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी खूप परिश्रम घेऊन समाजाला शिक्षणाची दिशा दिली. परंतु आता महिलांनी त्यांच्या कार्याला पुन्हा गतीने पुढे नेण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.

 

यावेळी मोहाडी सीएमआरसी अध्यक्ष रूखमा आगाशे, तुमसर सीएमआरसी अध्यक्ष सुनिता गभणे, लाखांदूर सीएमआरसी सचिव शुद्धमता नंदागवळी, साकोली सीएमआरसी सचिव पुष्पा कुंभरे, पवनी सीएमआरसी अध्यक्ष प्रिती मेश्राम, पालांदूर सीएमआरसी सचिव छबिता खोब्रागडे, वरठी सीएमआरसी अध्यक्ष भैरवी सार्वे यांच्यासह सीएमआरसी व्यवस्थापक, लेखापाल, समन्वयक सहयोगीनी, उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शामरावजी बोंदरे, सरोज श्रीपाद, महेंद्र गिलोरकर, सुरेंद्र पिसे यांनी सहकार्य केले.