शेतकऱ्यांच्या शेतातील रस्ते समस्या सोडवणुकीसाठी रस्ता लोक अदालतीचे आयोजन
चंद्रपूर, दि. 29 : शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरीता शेत रस्ते असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असतांना ग्रामीणस्तरावर अनेक ठिकाणी सदर शेत रस्ते अडविल्याचे तसेच अतिक्रमण केल्याचे तक्रारी वरोरा तहसील कार्यालयास प्राप्त झालेल्या होत्या. सदर अडचणी विहित वेळेत सोडवून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यादृष्टीने कामकाज मोहीम स्वरूपात राबविण्याचे निश्चित करण्यात आले. दि. 16 डिसेंबर 2022 ते 5 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये रस्ता लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने, 28 डिसेंबर रोजी तालुक्यातील तीन मंडळस्तरावर प्रत्यक्षपणे लोक अदालत घेण्यात आली. सदर लोकअदालतीमध्ये माढेळी मंडळ, शेगाव मंडळ, खांबाळा येथील एकूण 48 इतकी प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात आली. सदर मोहिमेला नागरिकांमार्फत प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मंडळस्तरावर येऊन प्रत्यक्ष शेत रस्त्यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी ही मोहीम आयोजित केल्याबाबत शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमात निकाली निघालेल्या प्रकरणांचे आदेश 5 जानेवारी 2023 रोजी तहसीलमधून वाटप करण्यात येणार आहेत. बैठकीला संबंधित मंडळाचे तलाठी, मंडळ अधिकारी, संबंधित मंडळाचे लिपिक आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.