कोचीन शिपयार्ड लि. च्या पथकाकडून अर्नाळ्यातील ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’च्या ‘स्वानंद सेवा सदन – दिव्यांग वसतिगृहा’च्या कामकाजाची पाहणी.

कोचीन शिपयार्ड लि. च्या पथकाकडून अर्नाळ्यातील ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’च्या ‘स्वानंद सेवा सदन – दिव्यांग वसतिगृहा’च्या कामकाजाची पाहणी.

 

· एनजीएफ सामाजिक संस्थेने हाती घेतलेल्या ‘स्वानंद सेवा सदन – दिव्यांग वसतिगृह’ या लोकहिताच्या प्रकल्पाची निर्मिती जलदगतीने व्हावी यासाठी ‘कोचीन शिपयार्ड लि.’ सदैव पाठीशी – संपतकुमार पी. एन.  (सहा. महाप्रबंधक व सहाय्यक व्यवस्थापक (सीएसआर), कोचीन शिपयार्ड लि.)

 

· ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’चे ‘दिव्यांग मुले आणि त्यांच्या एकल पालकांसाठीचे भारतातील पहिल्या वसतिगृहाच्या कामकाजास गती देण्यासाठी कोचीन शिपयार्ड लि. वित्तीय मदत !

 

· “सर्वांनी प्रयत्न केल्यास अश्यक्य गोष्टीही शक्य होतात. दिव्यांगांसाठी निर्माण होणाऱ्या या प्रकल्पासाठी ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’सोबत आमचा खारीचा वाटा – सौ. आम्रपाली साळवे,

(संचालक व सीएसआर कमिटी मेंबर, कोचीन शिपयार्ड लि.)

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते भूमिपूजन झालेल्या ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’च्या ‘स्वानंद सेवा सदन – दिव्यांग वसतिगृहा’च्या निर्मितीचे काम सध्या विरार पश्चिमेच्या अर्नाळा गावात वेगात सुरु आहे. कोचीन येथील प्रख्यात कोचीन शिपयार्ड लि., एसबीआय जनरल इंश्योरंस, इत्यादी भारत सरकारच्या संस्थांचे आर्थिक पाठबळ या विशेष उपक्रमाला लाभल्याने ‘दिव्यांग मुले आणि त्यांच्या एकल पालकांसाठीचे भारतातील एक अत्यंत गरजेची वस्तू लवकरच या भूमीत उभी राहणार आहे.

‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड’ या भारत सरकारच्या कंपनीने नुकताच ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’च्या ‘स्वानंद सेवा सदन – दिव्यांग वसतिगृहा’च्या या प्रकल्पाची विशेष पाहणी केली. संपतकुमार पी एन.( सहा. महाप्रबंधक,सहाय्यक व्यवस्थापक (सीएसआर), कोचीन शिपयार्ड लि.), त्यांचे सहाय्यक युसूफ. आणि आम्रपाली साळवे (संचालक व सीएसआर कमिटी मेंबर, कोचीन शिपयार्ड लि.) या शिष्टमंडळाने थेट मुंबई विमानतळावरून विरार येथील अर्नाळा या ठिकाणी ‘स्वानंद सेवा सदन’च्या साईटवर भेट दिली. वसतिगृहाच्या कामाच्या पाहणीनंतर संपतकुमार पी.एन. म्हणाले, “आम्ही विचार केला होता त्यापेक्षा अधिक जलद गतीने आणि उत्कृष्ट दर्जाचे काम सुरु आहे., ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’च्या संस्थापक अध्यक्षा नूतन गुळगुळे, संस्थापक-विश्वस्त विनायक गुळगुळे, अमरनाथ तेंडूलकर आणि त्यांचे आर्किटेक्ट कांचन पाटील, कॉन्ट्रॅक्टर प्रशांत पाटील, दर्शन राऊत यांच्यासोबत प्रत्यक्ष कामाची पाहणी करून आढावा घेतला असता, संस्थेच्या या प्रकल्पाचे अत्यंत नियोजनबद्धरित्या दर्जेदार काम सुरू असून, आमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक वेगवान पद्धतीत ते सुरु आहे. आर्किटेक्ट व कॉन्ट्रॅक्टर यांच्यासोबाबत झालेल्या चर्चेनुसार मार्च २०२३ अखेरीस या वसतिगृहाच्या तीन मजल्यांचे बांधकाम पूर्ण होऊ शकेल., हा लोकाभिमुख उपक्रम दिव्यांगांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन तयार होत असल्याने या कामाला आम्ही प्राधान्य देत आहोत. आमच्या संचालक आम्रपाली साळवे मॅडम यासाठी सातत्याने पुढाकार घेत आहेत.

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना आम्रपाली साळवे म्हणाल्या, “या उपक्रमाच्या निमित्ताने महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पहिल्यांदा पालघर जिल्ह्यात आणि वसई नगरपालिकेच्या हद्दीत भेट दिली आहे. ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन’ हा प्रकल्प या भूमीत घेऊन आल्याने भारतासह विश्वात अर्नाळ्याचे नाव झळकले. हा प्रकल्प आर्थिक कारणास्तव अडकून नये, अशी भावना असल्याने मी ‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड’ या भारत सरकारच्या कंपनीची संचालक या नात्याने ‘स्वानंद सेवा सदन’ प्रकल्पाची माहिती घेऊन गेले आणि आमच्या सर्व संचालक मंडळाला या प्रकल्पात तथ्य वाटल्याने सर्वांनी संमती दिली. आज समाजात दिव्यांग नागरिकांचे प्रश्न फार गंभीर आहेत., ‘गुळगुळे दांपत्य’ त्यावर काम करीत आहे. त्यांना आर्थिक बळ देऊन समाजातील असे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन हातभार लावल्यास हे काम सप्टेंबर२०२३ पर्यंत पूर्ण होईल.”

या शिष्टमंडळाचे स्वागत अध्यक्षा आणि ‘दिव्यांगांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी लढाऊ ‘माय’ अशी ओळख असलेल्या नूतन गुळगुळे यांनी केले. त्या म्हणाल्या हा प्रकल्प खास ‘करोना–१९’मुळे पालकत्व गमावलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील ‘दिव्यांग’ बालकासह त्याच्या एकल पालकाच्या’ निवासाची व्यवस्था, मार्गदर्शन, आरोग्य सेवा, शिक्षण इत्यादी देणारे भारतातील हे पहिले वसतिगृह असून येथे ४० दिव्यांग मुलांच्या निवासाची व्यवस्था असणार आहे. ‘कोचीन शिपयार्ड लिमिटेड’, आम्रपाली साळवे, संपतकुमार पी.एन. युसूफजी यांच्याप्रमाणेच समाजातील इतर दानशुरांनी या प्रकल्पासाठी पुढे येण्याची गरज आहे.” तर अमरनाथ तेंडूलकर म्हणाले “दिव्यांग वसतिगृहाच्या निर्मितीसाठी मी अखेरपर्यंत सेवा देण्यासाठी वचनबद्ध झालो असून या प्रकल्पामुळे माझ्या जन्मभूमीचे नाव त्रिखंडात दुमदुमणार आहे.”