जिल्ह्यात अतिरिक्त हत्तीरुग्ण संक्रमण सर्वेक्षणाला सुरुवात Ø अत्याधुनिक एफ.टि.एस किटव्दारे होणार रक्त नमुने तपासणी

जिल्ह्यात अतिरिक्त हत्तीरुग्ण संक्रमण सर्वेक्षणाला सुरुवात

Ø अत्याधुनिक एफ.टि.एस किटव्दारे होणार रक्त नमुने तपासणी

चंद्रपूर, दि. 19: चंद्रपुर जिल्हा हा हत्तीरोगासाठी अतिसंवेदनशिल जिल्हा आहे. जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरणासाठी सन 2004 पासुन सार्वत्रिक औषधोपचार मोहिम दरवर्षी राबविण्यात येते. सदर मोहिमेची फलश्रृती म्हणुन जिल्हयात नविन हत्तीरुग्ण संक्रमणाची संख्या कमी होत आहे.

 

संक्रमण पडताळणीच्या टप्प्यात जिल्हयातील 11,700 नागरीकांचे 16 डिसेंबर 2022 पासुन एफ.टि.एस किटव्दारे रक्त नमुने तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. चिमुर व सिंदेवाही तालुका वगळुन प्रत्येक तालुक्यातुन 3 ठिकाणावरुन 900 रक्तनमुने या किटद्वारे तपासायचे आहे. हि तपासणी 20 वर्षावरील नागरीकांची करावयाची असुन ती दिवसाच केली जात आहे.

 

जिल्हयात हत्तीरोगाच्या संक्रमण पडताळणीकरीता सर्व तालुक्यात हत्तीरोगाच्या संक्रमणाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. जिल्हयातील सर्व तालुक्यातून एकुण 9000 रात्र रक्त नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 34 नमुने हत्तीरोगाच्या संक्रमणाने दुषित आढळुन आले असुन सर्व दुषित रुग्णांना औषधोपचार करण्यात आला आहे. या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक रुग्ण हे चिमुर व सिंदेवाही तालुक्यातील असल्याचे तपासणीअंती निदान झाले.

 

एफ.टि.एस किट ही अत्याधुनिक प्रकारची किट असुन महाराष्ट्र शासनाकडुन हि किट पुरविण्यात आली आहे. सदर उपक्रम महाराष्ट्रात प्रथमच केल्या जात आहे. सदर किटच्या वापरासंदर्भात जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील दादासाहेब कन्नमवार सभागृहात सर्व आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळा वैद्यानिक अधिकारी यांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून आरोग्य सेवा (हिवताप) नागपुरचे सहाय्यक संचालक डॉ. निमगडे, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बोरकर उपस्थित होते. सदर सर्वेक्षणादरम्यान येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास सर्वतोपरी सहकार्य करुन आपली तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांनी केले आहे.