जी-20 प्रतिनिधींना महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या कार्यक्रमांचे हॉटेल ताज पॅलेस येथे दिमाखदार आयोजन

जी-20 प्रतिनिधींना महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या कार्यक्रमांचे हॉटेल ताज पॅलेस येथे दिमाखदार आयोजन

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची हॉटेल ताज पॅलेस येथे उपस्थिती

 

मुंबई, दि. 13 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जी-20 प्रतिनिधींसाठी महाराष्ट्राचा समृद्ध वारसा आणि परंपरा दाखवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आज हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,जी – 20 परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह जी-20 परिषदेसाठी मुंबईत आलेल्या मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

 

भारताच्या जी-20 अध्यक्षपदाची संकल्पना “वसुधैव कुटुंबकम” असून जी-20 परिषद 13 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जी-20 च्या प्रतिनिधींना आणि बैठकांसाठी येणाऱ्या पाहुण्यांना संपूर्ण वर्षभर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि समृद्ध वारसाचे दर्शन होणार आहे.

 

महाराष्ट्राचा संपन्न वारसा, महाराष्ट्रातील संस्कृती, महाराष्ट्रातील वेगवेगळया परंपरा, वाटचाली आणि प्रगतीची माहिती याबरोबरच राज्यातील सांस्कृतिक कलेची ओळख जी-20 परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांना व्हावी यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील लोककलांवर आधारीत गेट वे ऑफ इंडिया येथील हॉटेल ताज पॅलेस येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर गेट वे ऑफ इंडियाजवळ विशेष लाईट शोचे आयोजन करण्यात आले होते तसेच यावेळी पुणेरी ढोल पथकाने सादरीकरण केले.

 

या परिषदेसाठी विविध देशांतून आलेल्या प्रतिनिधींना महाराष्ट्राचा वारसा, संस्कृती व परंपरा याची माहिती महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित विशेष सांस्कृतिक कार्यकमातून देण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा याची माहिती देणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली.

 

गणेश वंदना आणि पुणेरी ढोलच्या माध्यमातून जी-20 परिषदेसाठी मुंबईत आलेल्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रीय नृत्यापासून सुरुवात करण्यात आली. यानंतर मुंबईची ओळख असलेले कोळी बांधव आणि त्यांचे पारंपरिक वेशातील कोळी नृत्यही सादर करण्यात आले.

 

या कार्यक्रमात सहभागी कलाकारांनी संगीत वाद्यांची जुगलबंदी, सुफी नृत्य, शास्त्रीय संगीत व लोकगीत यांचे सुरेख सादरीकरण केले. महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती असलेले लावणी, गोंधळ, जोगवा यांचेही यावेळी सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित प्रतिनिधींचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले.

 

सांस्कृतिक कार्यक्रमानंतर जी-20 परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांनी हॉटेल ताज पॅलेसमध्ये खास मेजवानीचा आस्वाद घेतला. यानंतर प्रतिनिधींनी गेट वे ऑफ इंडिया परिसरात फेरफटका मारला. उपस्थित सर्व मान्यवरांनी गेट वे ऑफ इंडिया परिसरात आयोजित करण्यात आलेल्या लाईट शोचा आनंद घेतला.

 

या कार्यक्रमास माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, सांस्कृतिक कार्य आणि पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय,कायदा व सुव्यवस्था पोलीस सहायुक्त विश्वास नांगरे पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.