डाक कार्यालयात हयात प्रमाणपत्र काढण्याची सुविधा उपलब्ध
भंडारा, दि. 15 : नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात पेन्शन धारकांना हयात नामा (जीवन प्रमाणपत्र) आपल्या बँकेत जमा करावे लागते. बऱ्याच पेन्शन धारकांना बँकेत जाणे किंवा जिल्ह्याबाहेर जाणे शक्य होत नाही. त्याकरीता भारतीय डाक विभागामार्फत व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या वतीने अत्यंत सुलभ पध्दतीने पेन्शन धारकांना हयात प्रमाणपत्र काढण्याची सुविधा जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयात उपलब्ध आहे.
पेंशन धारक हयात प्रमाणपत्र जवळच्या कुठल्याही डाक कार्यालयात 70 रूपये भरून पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवकद्वारे काढू शकतात. प्रमाणपत्र काढण्यासाठी पेन्शनरचा आधार नंबर, पी.पी.ओ नंबर, मोबाईल नंबर, बँक पासबुक आवश्यक राहील. प्रमाणपत्र काढण्यासाठी फॉर्म भरण्याची आवश्यकता नसून ऑनलाईन पध्दतीने हयात प्रमाणपत्र काढले जाते व ग्राहकाला लगेच एस.एम.एस प्राप्त होतो. तरी जिल्ह्यातील पेन्शन धारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे डाक विभागातर्फे कळविण्यात आले आहे.