वन्यजीवांमधील आजाराचे जागतिक दर्जाचे संशोधन नागपूरमध्ये व्हावे -सुधीर मुनगंटीवार

वन्यजीवांमधील आजाराचे जागतिक दर्जाचे संशोधन नागपूरमध्ये व्हावे -सुधीर मुनगंटीवार

नागपूर दि. ३१ : जगामध्ये मोठ्या प्रमाणात प्राण्यांपासून मनुष्यांमध्ये जाणारे आजार वाढत आहे. कोरोना सारख्या आजाराने त्याची दृश्य भयानकता जगाला दाखवली आहे त्यामुळे वेळीच प्रतिबंध करण्यासाठी जागतिक दर्जाचे या संदर्भातील संशोधन नागपुरात व्हावे, अशा शुभेच्छा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिल्या.

 

नागपूर (गोरेवाडा) येथील वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रात संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन वनमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. ईशान्य भारतासह अन्य भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील या संशोधन केंद्राचे उद्घाटन आज त्यांनी केले. यावेळी संबोधित करताना त्यांनी जागतिक दर्जाचे संशोधन या ठिकाणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

 

नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणच्या वन्यजीव संशोधन केंद्रात होत असलेले हे संशोधन महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. वन्यजीवांपासून माणसांमध्ये येणाऱ्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आता मनुष्याचे आणि प्राण्यांचे वेगळे आरोग्य न बघता दोघांचेही एकच आरोग्य अशा पद्धतीने याकडे बघणे आवश्यक आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यालाच अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. मात्र या संशोधन क्षेत्रात भारताची भरारी अजून बाकी आहे. ही जबाबदारी आता नागपूरच्या केंद्राने घ्यावी, यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, या संशोधन केंद्राच्या सर्व अडचणी दूर करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी भंडारा -गोंदीयाचे खासदार सुनील मेंढे,माफसुचे कुलगुरु डॉ.आशिष पातूरकर, वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ.एस.व्ही. उपाध्ये, प्रकल्पाचे सल्लागार डॉ. अरुण कुमार रावत, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य वन्य संरक्षक वाय एल पी राव, आदींची यावेळी उपस्थिती होती.