पोलिस स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन

पोलिस स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन

चंद्रपूर, दि. 21 ऑक्टोबर : पोलिस स्मृतीदिनानिमित्त पोलिस मुख्यालय मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, पोलिस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, शेखर देशमुख (आर्थिक गुन्हे शाखा), उपविभागीय पोलिस अधिकारी सर्वश्री आयुष नोपानी, सुधीर नंदनवार, श्री. नाईक यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

21 ऑक्टोबर 1959 रोजी लदाख हद्दीत भारत सीमेवर 16 हजार फूट उंचीवर कडाक्याच्या थंडीत केंद्रीय राखीव पोलिस दलाची 10 शिपायांची तुकडी गस्त घालीत असतांना त्यांच्यावर अकस्मात हल्ला झाला. हल्ल्याची चाहूल लागतात सीमेच्या रक्षणार्थ अपुरे मनुष्यबळ व अपुरे शस्त्रास्त्रांची पर्वा न करता 10 पोलीस जवान प्राणपणाने लढले व मातृभूमीच्या रक्षणार्थ या शूरवीरांनी मोठ्या संख्येने असणाऱ्या शत्रूशी लढा देत स्वतःचे प्राण अर्पण केले. 24 दिवसानंतर म्हणजेच 13 नोव्हेंबर 1956 रोजी चीनने या वीर पोलीस जवानांचे मृतदेह भारताच्या स्वाधीन केले, तेव्हा संपूर्ण देश हळहळला. हॉटस्प्रिंग येथे ज्या ठिकाणी या शूरवीरांनी प्राण अर्पण केले तेथे संपूर्ण भारतातील पोलिसांनी या वीरांचे स्मारक उभारले आहे.

यावर्षी संपूर्ण भारतातून एकूण 264 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावित असताना आपल्या मातृभूमीच्या संरक्षणार्थ प्राणाची आहुती दिली आहे.

हुतात्मा झालेले पोलीस अधिकारी अंमलदार व कर्मचाऱ्यांना यावेळी पोलीस प्रशासनाकडून मानवंदना देण्यात आली. व हुतात्मा झालेल्या शूर वीरांची नावे वाचून दाखवण्यात आली.