इको फ्रेंडली श्रीगणेश कार्यशाळा उत्साहात मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग

इको फ्रेंडली श्रीगणेश कार्यशाळा उत्साहात मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग

चंद्रपूर २५ ऑगस्ट – चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे सावित्रीबाई फुले मनपा शाळेत इको फ्रेंडली श्रीगणेश कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत शालेय विद्यार्थ्यांनी आगामी गणेशोत्सव व पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शाडूच्या माती पासून मातीचे नंदीबैल व गणेश मूर्ती तयार केल्या.

सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होणार आहे. याची उत्सुकता सर्वांनाच व विशेषतः लहान मुलांना आहे तेव्हा विद्यार्थ्यांसाठी श्रीगणेश मूर्ती व बैलजोडी मुर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत इयत्ता १ ते १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व अत्यंत सुंदर असे इको फ्रेंडली गणपती तयार केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना नोटबुक, कंपास, पेनचे वाटप करण्यात आले

गणेशोत्सवाचा खरा आनंद हा मातीच्या गणेश मुर्तीत असुन प्लास्टर ऑफ पॅरीस पासुन बनविलेल्या मुर्त्यांनी प्रदुषण कसे होते याची माहीती विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच पर्यावरणपुरक गणपती बनवुन त्या मुर्तीला विसर्जित कसे करायचे व पर्यावरणाबाबत दक्ष कसे राहायचे याचीही माहीती देण्यात आली.

शाळेतील शिक्षकांनी शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व स्वतः मातीचा गणपती तसेच बैलजोडी बनवून दाखवल्यानंतर विद्यार्थ्यांनीही सहजतेने मग अशा मूर्ती साकारल्या. वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्ती स्वतःला करता आल्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर होता.आयुक्त राजेश मोहीते व अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, विद्यार्थ्यांनी मातीचे गणपती बनवावे आणि इतरांनाही प्रेरित करण्याचे आवाहन केले.