मोफत असूनही बूस्टर डोज बाबत नागरिक उदासीन Ø गावागावात जनजागृती करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

मोफत असूनही बूस्टर डोज बाबत नागरिक उदासीन Ø गावागावात जनजागृती करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

चंद्रपूर, दि. 1 ऑगस्ट : ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ अंतर्गत 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत बुस्टर डोज मोफत देण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र लाभार्थ्यांना स्वत:च्या खिशातून पैसे मोजावे लागतील. आता बुस्टर डोज मोफत उपलब्ध असूनही नागरिकांमध्ये याबाबत उदासीनता दिसून येते. भविष्यात कोविडचे दूरगामी परिणाम लक्षात घेता लसीकरण हाच एकमेव त्यावर उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही दिरंगाई करू नये. तसेच बुस्टर डोजबाबत सर्व यंत्रणेने गावागावात जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होत. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 दिवस बुस्टर डोज मोफत मिळणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहणे आवश्यक आहे. विविध गावांत तसेच वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये लसीकरणाचे सत्र आयोजित करण्यात येत आहे. मात्र नागरिकांचा प्रतिसाद कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व यंत्रणेने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन बुस्टर डोज घेण्याकरीता नागरिकांना प्रवृत्त करावे. नोडल अधिका-यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात विविध माध्यमातून जनजागृती करावी. तालुक्यात किंवा गावागावात आयोजित करण्यात येणा-या लसीकरण सत्राची माहिती आरोग्य यंत्रणेने त्वरीत संबंधित तहसीलदार आणि उपविभागीय अधिका-यांना पाठवावी, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

जिल्ह्यात आतापर्यंत 96.49 टक्के नागरिकांनी पहिला डोज, 83.06 टक्के नागरिकांनी दुसरा डोज घेतला आहे. बुस्टर डोजसाठी जिल्ह्यात 11 लक्ष 92 हजार 20 लाभार्थी पात्र असून आतापर्यंत 88851 नागरिकांनी बुस्टर डोज घेतला आहे. तसेच 12 ते 14 वर्षे वयोगटातील 71746 पात्र लाभार्थ्यांपैकी पहिला डोज 87.22 टक्के, दुसरा डोज 50.89 टक्के तर 15 ते 17 वयोगटातील 1 लक्ष 9 हजार 190 लाभार्थ्यांपैकी पहिला डोज 69.75 टक्के आणि दुसरा डोज 46.54 टक्के तरुणांनी घेतला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.